T20 World Cup 2024, IND vs SA Final:  टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावत भारतीय संघाने इतिहास रचला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने आफ्रिकन संघाचा ७ धावांनी पराभव करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वविजेते होण्याचा मान मिळविला.  रोहित शर्मासह भारताचे सर्वच खेळाडू या विजयानंतर भावुक झाले. या विजयासह रोहित शर्माने इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे रोहित शर्माला त्याच्या फॅन्सने मुंबईचा राजा अशी उपाधी दिली आहे. काल (२९ जून) मॅच संपल्यानंतर क्रिकेटच्या चाहत्यांनी मरिन ड्राईव्हवर एकच जल्लोष केला.

रोहित शर्माने आत्तापर्यंत भारतीय संघाचा कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६२ सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघाने ५० सामने जिंकले आहेत. यासह भारतीय संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवला आणि कर्णधार म्हणून रोहितचा हा ५०वा विजय असेल आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये हा टप्पा गाठणारा तो पहिला खेळाडू ठरेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजयाचा विक्रम ७८ टक्के राहिला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ४८ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने याआधीच उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी करून टी-२० विश्वचषकाच्या एका सीझनमध्ये भारतीय कर्णधार म्हणून विराट कोहलीचा विक्रम मोडला होता आणि यंदाच्या मोसमात भारतासाठी आता सर्वाधिक भावा करणारा खेळाडूही ठरला.

हेही वाचा >> IND vs SA Final: भारताच्या ऐतिहासिक विजयासह रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटमध्ये ही कामगिरी ठरला पहिलाच कर्णधार

रोहित शर्माच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. यावेळी मुंबईचा राजा रोहित शर्मा असा नाराही दिला. तसंच, दुनियेचा राजा रोहित शर्मा, पुण्याचा राजा रोहित शर्मा अशीही घोषणा या व्हिडीओच्या माध्यमातून ऐकू येत आहे. या व्हिडिओच्या खालीही अनेक नेटिझन्सने कॉमेंट्स केल्या असून टीम इंडिया शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी फक्त रोहित शर्माच मुंबईचा राजा असल्याचं सांगितलं आहे.

मरीन ड्राईव्हप्रमाणेच वांद्रेच्या कार्टर रोडवरही तरुणांनी रोहित शर्माच्या नावाने जल्लोष केला.

एवढंच नव्हे तर एक्सवर रोहित शर्मा ट्रेंड होत असून मुंबईचा राजा रोहित शर्माच्या पोस्टही केल्या जात आहेत.

रोहित शर्माच्या सर्वाधिक धावा

या विश्वचषकात भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने ८ सामन्यांच्या ८ डावात ३६.७१ च्या सरासरीने आणि १५६.७० च्या स्ट्राईक रेटने एकूण २५७ धावा केल्या. रोहित शर्माने या दरम्यान ३ अर्धशतके झळकावली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९२ धावा होती. या खेळीत त्याने २४ चौकार आणि १५ षटकारही मारले. रोहित शर्मा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता तर एकूण सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.