Suryakumar Yadav’s Incredible Catch Seals T20 World Cup for India : भारताने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला उत्कृष्ट झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. ज्याचा व्हिडीओ आाता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला.
भारताने १७ व्या षटकात सामन्याचे चित्र फिरवले. १६ षटकांत दक्षिण आफ्रिकेने चार गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मिलर आणि क्लासेन क्रीजवर होते. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या २४ चेंडूत २६ धावांची गरज होती. यानंतर १७ व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद करत केवळ चार धावा दिल्या. १८ व्या षटकात बुमराहने यानसेनला बाद करत दोन धावा दिल्या. अर्शदीपने १९व्या षटकात चार धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर मिलरला झेलबाद केले. सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर धावत जाऊन उत्कृष्ट झेल घेत सामन्याला मोठी कलाटणी दिली. ज्यामुळे हा सामना भारतीय संघाच्या पारड्यात झुकला.
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या अप्रतिम झेलचा व्हिडीओ व्हायरल –
त्यानंतर या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला. यासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि २ षटकार आले. तर अक्षर पटेलने ३१ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिवम दुबेही शेवटी चमकला. त्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २७ धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ॲनरिक नॉर्किया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.