T20 World Cup 2022: टी २० विश्वाचषकात भारत विरुद्ध बांग्लादेश हा सामना वादाचा मुद्दा ठरला आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने तर या सामन्यांवरून टीम इंडियाच्या खेळावर अनेक प्रश्न केले आहेत. अलीकडेच पाकिस्तानी पत्रकाराने आयसीसी आंतराराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाची बाजू घेत असल्याचा आरोप केला होता यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही भारताच्या विरुद्ध अप्रत्यक्ष आरोप केले होते. आफ्रिदीच्या टिप्पणीने जागतिक क्रिकेटमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, मात्र शुक्रवारी बीसीसीआयचे प्रमुख रॉजर बिन्नी यांनी या आरोपांना तोडीस तोड उत्तर दिले आहे.
भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात मैदान ओले होते का?
अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याविषयी चर्चेत समा टीव्हीच्या पाकिस्तानी पत्रकाराने म्हटले होते, “शाकिब अल हसनने हा दावा केला होता की सामना सुरु झाल्यावर मैदान पावसामुळे ओलेच होते, तरीही सामना खेळला गेला, यावरून असे दिसते का ही आयसीसी भारताच्या बाबत पक्षपात करत आहे. कोणत्याही परिस्थितीत भारत उपांत्य फेरी गाठण्यासाठी आयसीसी जोर लावत आहे असे वाटते का असा प्रश्न आफ्रिदीला विचारण्यात आला होता.
आफ्रिदीची भारतावर टीका
यावर उत्तर येताना आफ्रिदी म्हणाला की, “काय घडले ते मला माहीत आहे. पावसाचे प्रमाण पाहता, ब्रेकनंतर लगेचच खेळ पुन्हा सुरू झाला. हे अगदी स्पष्ट आहे की आयसीसीचा खेळ मोठा आहे, बांग्लादेश भारताच्या विरुद्ध खेळत असताना येणारा दबाव यामुळेही खेळावर प्रभाव झालेला असू शकतो.”
रॉजर बिन्नी यांनी आफ्रिदीची बोलती केली बंद
आफ्रिदीच्या या वक्तव्यावर रॉजर बिन्नी यांनी कडाडून टीका केली आहे, बिन्नी यांनी ANI ला सांगितले की “आयसीसीने भारताची बाजू घेतली असे म्हणता येणार नाही. आम्हाला इतर संघांपेक्षा वेगळे काय मिळते? पाहायचं तर भारत हे क्रिकेटमधील एक मोठे पॉवरहाऊस आहे परंतु आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाते. बांगलादेश पाठलाग करताना पुढेच होता पण पावसानंतर त्यांचाही जोर ओसरला व संघ मोडकळीस आला यामुळेच भारताने त्यांचा ५ विकेट्सने पराभव केला.
टी २० विश्वचषकात सुपर १२ ग्रुप २ च्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात पावसामुळे काही वेळ सामना थांवण्यात आला होता जेव्हा सामना पुन्हा सुरु झाला तेव्हा बांग्लादेशचा कर्णधार शकिब अल हसन आनंदी नव्हता. भारताने तुफान फटकेबाजी करत १८४ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते मात्र भारताची गोलंदाजी सुरु होताच पावसाने हजेरी लावली आणि सगळा खेळ बदलला. पावसामुळे जवळपास तासभर थांबलेल्या मॅचची पुन्हा सुरुवात झाली अन यावेळेस बांग्लादेशला १६ षटकात १५१ धावांचे टार्गेट देण्यात आले होते.