India break Pakistan’s record : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चा ८ वा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडवर ८ विकेट्सनी मात करत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. टीम इंडियासाठी हा विजय खूपच खास राहिला. कारण या सामन्यात टीम इंडियाने विक्रमांची रांग लावली. विशेष म्हणजे भारताने आयर्लंडला नमवत पाकिस्तानला एका खास विक्रमाच्या बाबतीत मागे टाकले आहे.
टीम इंडियाने आयर्लंडला हरवून रचला इतिहास –
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ८ विकेट्सने विजय मिळवला. टी-२० विश्वचषकातील टीम इंडियाचा हा २९ वा विजय आहे. यासह टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत पाकिस्तानला मागे टाकले आहे. टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघाने २८ विजय आपल्या नावावर केले आहेत. अशा स्थितीत टीम इंडिया आता पाकिस्तानच्या पुढे गेली आहे. या यादीत आता फक्त श्रीलंका संघ भारतापेक्षा पुढे आहे. त्याच्या नावावर ३१ विजय आहेत. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली.
टी-२० विश्वचषकातील सर्वाधिक विजय (सुपर ओव्हरमधील विजयांसह):
१. श्रीलंका: ५२ सामन्यांमध्ये ३२ विजय
२. भारत: ४६ सामन्यांत २९ विजय
३. पाकिस्तान: ४७ सामन्यांत २८ विजय
४. ऑस्ट्रेलिया: ४० सामन्यांमध्ये २५ विजय
५. दक्षिण आफ्रिका: ४१ सामन्यांत २५ विजय
हेही वाचा – IND vs IRE : टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी सलामी! आयर्लंडविरुद्ध रोहित-ऋषभसह जसप्रीत बुमराह चमकला
भारताच्या वेगवान माऱ्यापुढे आयर्लंडने टेकले गुडघे –
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरला. भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करताना आयर्लंडचा डाव १६ षटकांत ९६ धावांत गुंडाळला. यादरम्यान हार्दिक पंड्याने ४ षटकात केवळ २७ धावा दिल्या आणि सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने २-२ फलंदाजांना बाद केले. दुसरीकडे अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा – IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार
टीम इंडियाने २ गडी गमावून नोंदवला विजय –
टीम इंडियाने ९७ धावांचे लक्ष्य १२.२ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले. रोहित शर्माने ३२ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचले, मात्र तो दुखापतग्रस्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी ऋषभ पंतने ३६ धावांची नाबाद खेळी केली. त्याने षटकार मारुन भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.दुसरीकडे, विराट कोहली केवळ एक धाव करू शकला आणि सूर्यकुमार यादव २ धावा करून बाद झाला.