काल म्हणजेच १० नोव्हेंबरला झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यात भारताला लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक क्रिकेटप्रेमींना यंदाच्या टी२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहायचा होता. मात्र भारताच्या अत्यंत वाईट प्रदर्शनामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. या सामान्यानंतर भारताच्या खराब प्रदर्शन आणि रोहित शर्माच्या कप्तानीवर अनेकजण टीका करत आहेत. त्यातच आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही भारताच्या खेळीवर वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. नुकतंच पाकिस्ताचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने भारताच्या निराशाजनक पराभवावर भाष्य केले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताच्या निराशाजनक पराभवाच्या पार्श्वभूमीवर वसीम अक्रम याने आयपीएलवर टीका केली आहे. त्याच्या मते भारतातील तरुण वेगवान गोलंदाजांचे करिअर आयपीएलमुळेच उध्वस्त होत आहे. यादरम्यान त्याने आवेश खान याचे उदाहरण देत सांगितले की आयपीएलचे एक सीजन खेळल्यानंतर वेगवान गोलंदाज आपला वेग गमावतात.
ए स्पोर्ट्सच्या द पॅव्हेलियन शोमध्ये वसीम म्हणाला, “मी भारतीय वेगवेगवान गोलंदाजांबद्दल एका गोष्टीची नोंद केली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, भारताचा आवेश खानसारखा एक गोलंदाज, तो १४५ किमी प्रतितास या वेगाने गोलंदाजी करायचा. तसेच त्याचा १४०पेक्षा जास्त कन्सिस्टन्सी रेट होता. मात्र आयपीएलचे एक सीजन खेळल्यानंतर त्याचा हा वेग १३० किमी प्रतितासावर आला. एक सीजन खेळल्यावरच त्याच्या वेगामध्ये कमालीची घट झाली.”
तसेच, वसीम पुढे म्हणाला की, “२००८ मध्ये आयपीएल सुरु झाल्यावर सर्वांनाच असे वाटले होते की याचा भारताला खूपच चांगला फायदा होईल. मात्र तसे झालेले दिसले नाही. २००७ साली भारताने ती टी२० विश्वचषक जिंकला. पण आयपीएल सुरु झाल्यापासून भारताने एकदाही ही ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे प्रश्न पडतो, की परदेशातील लीग खेळण्याची परवानगी दिल्यास भारताचा दृष्टिकोन बदलेल का?”