How Pakistan Can Qualify for Super Eight Stage of T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक २०२४ मधील २४ व्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेवर विजय मिळवत सुपर८ फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा अमेरिकेवरील विजय हा गट टप्प्यातील सामन्यांमधील टीम इंडियाचा सलग तिसरा विजय होता. पण हा भारताचा विजय आता पाकिस्तानच्या चांगल्याच पथ्यावर पडला आहे. पाकिस्तानला भारतानेच सुपर८ फेरी गाठण्यासाठी मोठी मदत केली आहे, पाहा नेमकं काय घडलं.
भारताने यजमान अमेरिकेचा पराभव करत पाकिस्तानला खूप मदत केली आहे. पाकिस्तान अजूनही सुपर८च्या शर्यतीत कायम आहे. भारतीय संघाने बाबर सेनेला स्पर्धेत टिकून राहण्याची एक मोठी संधी दिली आहे. १२ जूनला झालेल्या न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने अमेरिकेचा ७ गडी राखून पराभव केला, ज्यामुळे आता सुपर८ ची शर्यत आणखीनच मनोरंजक बनली आहे.
भारताने अमेरिकेला पराभूत करत कशी केली पाकिस्तानला मदत?
भारतीय संघाने अमेरिकेला पराभूत केल्याने संघाच्या नेट रन रेटवर मोठा परिणाम झाला आहे. आता अमेरिकेचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षाही खराब झाला आहे. दोन्ही संघांचे शेवटचे सामने आयर्लंडविरूद्ध खेळवले जाणार आहेत. सध्या गुणतालिकेत अमेरिकेचा संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे तर पाकिस्तानचा संघ २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. पण सध्या अमेरिकेपेक्षा पाकिस्तानचा नेट रन रेट चांगला आहे.
अशा परिस्थितीत आता पाकिस्तानला आपल्या पुढच्या सामन्यात आयर्लंडचा पराभव करावा लागेल. पाकिस्तानला त्यांच्या शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात आयर्लंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल, ज्यामुळे ते थेट सुपर८ साठी पात्र ठरतील. पाकिस्तान विजयी ठरला तर दोन्ही संघांचे प्रत्येकी केवळ ४ गुण होतील. पण पाकिस्तानचा नेट रन रेट अमेरिकेपेक्षा चांगला असल्याने ते थेट सुपर एट फेरी गाठतील.
हेही वाचा – IND VS USA T20 World Cup: पेनल्टीचा भुर्दंड बसला आणि अमेरिकेने टाकली मान; काय आहे नवीन नियम?
जर अमेरिकेने शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात आयर्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवला किंवा सामना रद्द झाल्यास एक गुण जरी मिळवला तरी अमेरिकेचा संघ सुपर८ साठी पात्र ठरेल. एक गुण जरी अमेरिकेने मिळवला तरी संघ पुढील फेरीत जाईल आणि पाकिस्तान शेवटचा सामना जिंकूनही केवळ ४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो.
तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ सलग ३ पैकी ३ सामने जिंकून टी-२० विश्वचषकाच्या सुपर८ टप्प्यासाठी पात्र ठरला आहे. आता टीम इंडियाचा कॅनडासोबतचा शेवटचा सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. यानंतर भारतीय संघ सुपर ८ फेरीतील सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना होईल.