T20 World Cup Final 2024, India vs South Africa Score: टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने मोठी धावसंख्या केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती, मात्र भारतीय फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. या खेळीदरम्यान टीम इंडियाने टी-२० विश्वचषक फायनलचा मोठा विक्रमही मोडला. भारतीय संघाकडून विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी शानदार फलंदाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. संथ खेळपट्टीवर पॉवरप्लेमध्ये ३ बाद ३४ धावसंख्येवर असताना भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरागमन केले आणि टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा केल्या. याआधी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही संघाने एवढी मोठी धावसंख्या उभारली नव्हती. याआधी २०२१ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग करताना १७३ धावा केल्या होत्या.
T20 विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या
१७६/७ – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ब्रिजटाउन, २०२४
१७३/२ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, २०२१
१७२/४ – न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुबई, २०२१
१६१/६ – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, कोलकाता, २०१६
१५७/५ – भारत विरुद्ध पाकिस्तान, जोहान्सबर्ग, २००७
विराट कोहलीने या खेळीत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. तर अक्षर पटेलने ३१ चेंडूत ४७ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने या खेळीत १ चौकार आणि ४ षटकार ठोकले. दुसरीकडे, शिवम दुबेनेही १६ चेंडूत २७ धावांची खेळी केली.
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वोच्च धावसंख्या
८५ धावा – केन विल्यमसन विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२१)
८५ धावा – मार्लन सॅम्युअल्स विरुद्ध इंग्लंड (२०१६)
७८ धावा – मार्लन सॅम्युअल्स विरुद्ध श्रीलंका (२०१२)
७७ धावा – मिचेल मार्श वि. न्यूझीलंड (२०२१)
७७ धावा – विराट कोहली विरुद्ध श्रीलंका (२०१४)
७६ धावा – विराट कोहली विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२४)*
७५ धावा – गौतम गंभीर विरुद्ध पाकिस्तान (२००७)