T20 World Cup 2024, India Won Against Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषकात अजून एक चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत कोणत्याही संघाचा विजय निश्चित दिसत नव्हता. मात्र अखेरच्या षटकात भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा ६ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांनी भारताकडून अप्रतिम खेळी केल्या. त्याचबरोबर संपूर्ण संघाने क्षेत्ररक्षण करताना चांगली कामगिरी केली. पाकिस्तानविरूद्ध विजयाची नोंद करून टीम इंडियाने एक मोठा विक्रम केला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ११९ धावा केल्या होत्या. भारताकडून फक्त ऋषभ पंत चांगली फलंदाजी करू शकला. त्याने ४२ धावांची शानदार खेळी खेळली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाने १० षटकांत १ गडी गमावून ५७ धावा केल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाला विजय मिळवणे कठीण वाटत होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजांमुळे टीम इंडियाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि पाकिस्तानी संघ २० षटकांत केवळ ११३ धावाच करू शकला आणि टीम इंडियाने हा सामना ६ धावांनी जिंकला.
भारतीय संघाने पाकिस्तानसमोर १२० धावांचे लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला. याआधी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने इतक्या लहान धावसंख्येचा बचाव केला नव्हता. भारतीय संघाने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० सामन्यात १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता. पण आता भारताने हा विक्रम मागे टाकला आहे.
हेही वाचा – IND vs PAK: ऋषभने रचला पाया, बुमराहने रचला कळस; भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय
टी-२० मध्ये भारताने सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केलेले सामने:
१२० वि पाकिस्तान, २०२४*
१३९ वि झिम्बाब्वे, २०१६
१४५ वि इंग्लंड, २०१७
१४७ वि बांगलादेश, २०१६
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा संयुक्तपणे बचाव करणारा संघही टीम इंडिया ठरली आहे. टी-२० विश्वचषकात भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला. भारताने २०२४ साली पाकिस्तानविरुद्ध आणि २०१४ मध्ये श्रीलंकेच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. टी-२० विश्वचषक स्पर्धेत १२० धावांपेक्षा कमी लक्ष्याचा बचाव करण्याच फार कमी संघांना यश आले आहे.
हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल
टीम इंडियाचा वर्ल्डरेकॉर्ड
टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान संघांमधील हा ८ वा सामना होता. यादरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत विक्रमी ७वा विजय मिळवला. यासह टीम इंडिया टी-२० विश्वचषकात एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनला आहे. या यादीत पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ दुसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध ६ सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने ६ वेळा वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.