T20 World Cup India vs Netherlands: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवण्यानंतर भारतीय संघ आज टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आपला दुसरा सामना नेदरलँड्सविरोधात खेळणार आहे. सिडनी येथील क्रिकेट मैदानात भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवताना भारतीय संघाचं लक्ष दुसऱ्या गटामधील गुणतालिकेमध्ये वरचा क्रमांक पटकावण्यासाठी धावगती वाढवण्यावर नक्कीच असेल. पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने अगदी शेवटच्या चेंडूंवर जिंकला असून भारतीय संघाचं नेट रनरेट ०.०५० इतकं आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही गटांमधून प्रत्येकी दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे नेट रनरेट वाढवून अव्वल स्थानी राहण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
नक्की वाचा >> Ind vs Ned: मैदानात उतरण्याआधीच छोट्या नेदरलँड्सची ‘विराट’ अपेक्षा; कर्णधार एडवर्डस म्हणाला, “त्या दिवशी विराटने…”
भारत आणि नेदरलँड्समध्ये आतापर्यंत एकही टी-२० अंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. दोन्ही संघ पहिल्यांदाच टी-२० प्रकारामध्ये आमने-सामने असतली. भारत आणि नेदरलँड्सदरम्यान १९ वर्षांपूर्वी दोन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. भारताने त्यानंतर २०११ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलँड्सविरोधात सामना खेळला होता.
भारतीय संघाने या स्पर्धेची केलेली दमदार सुरुवात आणि सर्व आकडेवारी पाहता नेदरलँड्सचा संघ दुबळा वाटत असला तरी ते भारतीय संघाला चांगलं आव्हान देऊ शकतात असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतारोधातील सामन्यामध्ये नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाजस बास डे लीडेच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष असेल. बास डे लीडने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये नऊ गडी बाद केले आहेत. त्याशिवाय त्याने फलंदाजीच्या माध्यमातूनही संघासाठी योगदान दिलं आहे. तर नेदरलँड्सचा सलामीवीर मॅक्स ओडॉडने ४५.६७ च्या सरासरीने १३७ धावा केल्या आहेत.
नेदरलँड्सने विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडच्या संघाला दोनदा धूळ चारली आहे. २००९ आणि २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी इंग्लंडला पराभूत केलं होतं. त्यांनी सुपर १२ च्या सामन्यामध्ये बांगलादेशला विजयासाठी अगदी रडवलं होतं. शेवटच्या क्षणी बांगलादेशला या संघाविरोधात निसटता विजय मिळाला होता.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्व्र कुमार मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, हर्षल पटेल.
नेदरलँड्स: स्कॉट एडवर्डस (कर्णधार/यष्टीरक्षक), कॉलिन एकरमन, टॉम कूपर, बास डी लीडे, ब्रँडन ग्लोव्हर, फ्रेड क्लासन, स्टीफन मेबर्ग, विक्रमजीत सिंग, तेजा निदिमानुरु, मॅक्स ओ’डाउड, टीम प्रिंगल, रूलॉफ व्हॅन डर मर्व, टीम व्हॅन गुगटेन, लोगन व्हॅन बीक, पॉल व्हॅन मीकरेन, शरीझ अहमद.
– वेळ : दु. १२.३० वा.
– थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)