टी-२० विश्वचषकाच्या भारताच्या दुसऱ्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने झुंजार अर्धशतक लगावलं. मात्र अर्थशतक लगावल्यानंतर रोहित लगेच तंबूत परतला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये स्वस्तात तंबूत परलेल्या रोहितला नेदरलँड्सच्या संघाविरुद्ध लय गवसली. अगदी तुफान फटकेबाजी रोहितने केल्याचं पहायला मिळालं नसलं तरी त्याने मारलेला चौकार आणि षटकार पाहण्यासारखे होते. या खेळीदरम्यान रोहितने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करुन घेतला आहे. मागील सामन्यात तुफान फलंदाजी करणारा विराट कोहली, सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावणारा युवराज सिंग, मिस्टर फिनीशर म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंग धोनी यांनाही जे जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं आहे.
नक्की पाहा >> Video: आनंदी आनंद गडे… सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर Six मारत अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीचं मैदानातच मजेदार सेलिब्रेशन
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. १२ चेंडूंमध्ये ९ धावा करुन के. एल. राहुल पुन्हा एकदा स्वस्तात तंबूत परतला. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर राहुलला पॉल व्हॅन मिकरीनने पायचित केलं. त्यानंतर मैदानात आलेल्या कोहलीने रोहितच्या सोबतीने भारतीय डावाला आकार दिला. ७२ धावांच्या भागीदारीमध्ये रोहितने संयमी अर्धशतक झळकावलं. रोहितने ३९ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी केली. १२ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित झेलबाद झाला.
रोहितने आपल्या खेळीमध्ये चार चौकार आणि तीन षटकार लगावला. रोहितने तिसरा षटकार लगावताच टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा भारतीय खेळाडू होण्याचा मान पटकावला. या सामन्याआधी रोहित सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी होता. तो युवराज सिंगपेक्षा दोन षटकांनी मागे होता. नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा समाचार घेताना रोहितने तीन षटकार लगावले. तिसरा षटकार लगावताच रोहितचे टी-२० विश्वचषकातील एकूण षटकारांची संख्या ३४ झाली आहे. कोणत्याही भारतीय फलंदाजापेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे.
नक्की वाचा >> Video: २५ बॉलमध्ये ५१ धावा अन् तो षटकार…; शेवटच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सूर्यकुमारने काय केलं पाहिलं का?
रोहित खालोखाल ३१ षटकांसहीत युवराज सिंग दुसऱ्या स्थानी, २४ षटकारांसहीत कोहली तिसऱ्या स्थानी, १६ षटकारांसहीत धोनी चौथ्या स्थानी आहे. त्याचप्रमाणे या यादीमध्ये १२ षटकारांसहीत सुरेश रैना पाचव्या स्थानी आहे. अव्वल दहामध्ये के. एल. राहुल (७), युसूफ पठाण(७), रॉबिन उथप्पा(६), विरेंद्र सेहवाग(६) आणि गौतम गंभीर(६) या खेळाडूंचा समावेश आहे.