T20 World Cup India vs Netherlands: टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर थरारक विजय मिळवल्यानंतर आज भारताचा दुसरा सामना नेदरलँड्सशी होत आहे. पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून आज तुलनेने दुबळ्या नेदरलँड्सशी होणारा सामना म्हणजे भारतीय संघासाठी सोपा पेपर असल्याचं मानलं जात आहे. मात्र या सामन्यामध्ये मैदानात उतरण्यापूर्वी नेदरलँड्स संघाच्या मनात भारताला पहिला सामना जिंकवून देणाऱ्या कोहलीबद्दल आदरयुक्त भीती निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नेदरलँड्स संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्डस केलेल्या एका विधानावरुन हे दिसून येत आहे. या छोट्या संघाने विराट कोहलीकडून एक माफक अपेक्षा व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> Ind vs Ned: सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणारा गोलंदाज अन् ‘हा’ सलामीवीर ठरु शकतो भारतासाठी डोकेदुखी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्कॉट एडवर्डस हा मूळाच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील आहे. तो अनेक वर्षांपूर्वी नेदरलँड्सला स्थलांतरित झाला. त्यानंतर आता आपल्याच मायदेशात तो नेदरलँड्स संघाचं नेतृत्व या टी-२० विश्वचषकामध्ये करत आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाला कोणी विचारही केला नसेल अशी वेगळी कामगिरी करता येईल असं एडवर्डस मानत नाही. मात्र आपल्या संघातील खेळाडूंनी सर्वोत्तम क्रिकेट खेळावं असं मत एडवर्डसने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. यावेळी त्याने विचारचा आवर्जून उल्लेख केला.

“त्या दिवशी विराटने जे काही केलं ते अविश्वसनीय होतं. अपेक्षा आहे की तो आमच्याविरुद्ध त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार नाही,” असं एडवर्डसने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं. “आम्ही हा सामना जिंकणार नाही असं अनेकांचं मत आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे आमच्यावर या सामन्याचा तणाव कमी आहे,” असंही एडवर्डसने म्हटलं. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाविरुद्ध मैदानात उतरुन खेळणं हा छान अनुभव असेल असा विश्वासही एडवर्डसने व्यक्त केला. “आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेनं खेळलं पाहिजे. आम्ही आमचा सर्वोत्तम संघ सामन्यात उतरवणार,” असंही एडवर्डसने सांगितलं. “विश्वचषकामध्ये खेळता यावं असं तुमचं कायमच स्वप्न असतं. त्यातही जगातील सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळणं हे फारच अविश्वसनीय आहे,” असं एडवर्डसने म्हटलं.

नेदरलँड्ससारख्या संघाला भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळणं हेच मोठं स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. आर्थिकदृष्ट्या नफा मिळवून देईल अशी स्पर्धा नेदरलँड्सविरुद्ध भरवणं हा पर्याय बीसीसीआयला परवडणारा नाही. म्हणूनच हा सामना म्हणजे नेदरलँड्ससाठी विशेष असणार आहे.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्व्र कुमार मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, हर्षल पटेल.

नेदरलँड्स: स्कॉट एडवर्डस (कर्णधार/यष्टीरक्षक), कॉलिन एकरमन, टॉम कूपर, बास डी लीडे, ब्रँडन ग्लोव्हर, फ्रेड क्लासन, स्टीफन मेबर्ग, विक्रमजीत सिंग, तेजा निदिमानुरु, मॅक्स ओ’डाउड, टीम प्रिंगल, रूलॉफ व्हॅन डर मर्व, टीम व्हॅन गुगटेन, लोगन व्हॅन बीक, पॉल व्हॅन मीकरेन, शरीझ अहमद.

– वेळ : दु. १२.३० वा.

– थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs netherlands t20 world cup hope virat does not repeat pakistan show against us says scott edwards scsg
Show comments