इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या एका पर्वामध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने त्यावेळेचा बंगळुरु रॉयल चँलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीला डोळे दाखवले होते. नवख्या सूर्यकुमारची ही कृती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत होती. या प्रकरणाला दीड ते दोन वर्षांचा कालावधी झाला असेल. सोशल मीडियावर या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. आज या प्रसंगाची आठवण होण्याचं कारण याच्या अगदीच विरुद्ध आहे. हे कारण म्हणजे सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असणाऱ्या टी-२० विश्वचषकातील भारताच्या दुसऱ्या सामन्यामध्ये नेदरलँड्सविरुद्ध सूर्यकुमारने इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार आणि तो पाहून नॉनस्ट्राइकर्स एण्डला असणाऱ्या कोहलीने दिलेली प्रतिक्रिया.

नक्की वाचा >> Ind vs Ned: जे कोहली, धोनी, सेहवागलाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं! T20 World Cup मध्ये ठरला पहिला भारतीय ज्याने..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झालं असं की नेदरलँड्ससारख्या दुबळ्या संघाविरुद्धही भारताची अडखळती सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र १२ चेंडूंमध्ये ९ धावा करुन के. एल. राहुल पुन्हा एकदा स्वस्तात तंबूत परतला. त्यानंतर मैदानात आलेल्या कोहलीने रोहितच्या सोबतीने भारतीय डावाला आकार दिला. ७२ धावांच्या भागीदारीमध्ये रोहितने संयमी अर्धशतक झळकावलं. रोहितने ३९ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी केली. १२ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित झेलबाद झाला. त्यानंतर कोहलीची सोबत करण्यासाठी मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने नाबाद राहत कोहलीला अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत साथ दिली.

नक्की वाचा >> Video: २५ बॉलमध्ये ५१ धावा अन् तो षटकार…; शेवटच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सूर्यकुमारने काय केलं पाहिलं का?

सूर्यकुमार आणि विराटने नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सूर्यकुमारने २५ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार लगावले. तर दुसरीकडे कोहलीही फटकेबाजी करत होता. शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने षटकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर विराटने एक धाव घेतली. फलंदाजीसाठी उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवला त्याचं अर्धशतकं पूर्ण करण्यासाठी पाच धावांची आवश्यकता होती. चेंडू पडताच त्याने लेग साईडला उत्तुंग असा षटकार लगावत भारताचा स्कोअर १७९ वर पोहोचवला आणि स्वत:चं अर्धशतकं साजरं केलं.

दोनच चेंडूंपूर्वी जे कोहलीने केलं होतं तोच परिणाम साधणारा हा फटका पाहून आणि विशेष म्हणजे शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमारचं अर्धशतक पूर्ण झाल्याचं पाहून कोहलीला प्रचंड आनंद झाला. षटकार लगावल्यानंतर क्रिझच्या मध्यभागी येऊन पेव्हेलियनकडे जाण्यासाठी निघालेल्या सूर्यकुमारला सेलिब्रेट कर असं सांगत कोहलीने दोन्ही हात वर केले. त्याचा उत्साह पाहून सूर्यकुमारनेही हात उंचावून आनंद साजरा केला. कोहलीने मायेनं त्याच्या हेल्मेटवर हात फिरवला आणि कामगिरीसाठी त्याचं अभिनंदन केलं. दोघांच्या या मीड मॅच सेलिब्रेशनची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे हा क्षण जवळजळ १.१ कोटी लोकांनी हॉटस्टार अ‍ॅपवरुन पाहिल्याचं व्हायरल झालेल्या फोटोंवरुन दिसून येत आहे. अनेकांनी याला उत्तम ब्रोमान्स म्हणजे दोन भावांमधील प्रेम असल्याचं म्हटलंय तर काहींनी हे सेलिब्रेशन आणि त्याचे फोटो म्हणजे आजच्या दिवसातील सर्वोत्तम फोटो असल्याचं म्हटलं आहे. पाहूयात व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ…

१)

२)

३)

४)

५)

६)

या सामन्यामध्ये विराट आणि सूर्यकुमारने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये ९५ धावांची नाबाद पार्टनरशीप केली. फलंदाजीनंतर बोलताना सूर्यकुमारने मला विराटबरोबर फलंदाजी करायला फार आवडतं. मी त्याचा छान आनंद घेतो असंही म्हटलं. आता विराटने ज्या पद्धतीने मोकळेपणे सेलिब्रेशन कर असा सल्ला सूर्यकुमारला दिला ते पाहता विराटबरोबर त्या क्षणी क्रिजवर असायला कोणाची काही हरकत नसावी. नाही का?

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs netherlands t20 world cup video suryakumar yadav finishes the india innings in style virat kohli epic reaction scsg