India vs Pakistan Highlights: बहुप्रतीक्षित व बहुचर्चित टी २० विश्वचषकातील पहिला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना काल, ९ जूनला पार पडला. भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत कमी आव्हान असूनही पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव झाला. भारताच्या फलंदाजीची फळी फार स्वस्तात कोलमडल्याने संपूर्ण डाव ११९ धावांत गुंडाळला गेला होता. पाकिस्तानसाठी ११९ धावांचे लक्ष्य अशक्यप्राय किंवा अगदी कठीणही नव्हते. विशेषतः रिझवानचा फॉर्म पाहता कदाचित सामना पाकिस्तानकडे झुकू शकतो अशी दाट शक्यता होती. पण पाक संघाने थोड्या थोड्या वेळेच्या अंतराने खूप सहज विकेट गमावल्या परिणामी ते लक्ष्य गाठण्यापासून ६ पाऊले मागे गेले.
सिराजचा फटका रिझवानला बसला आणि मैदानात…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी २० विश्वचषक 2024 सामन्यात रविवारी मोहम्मद सिराजच्या आक्रमक थ्रोने मोहम्मद रिझवानच्या हातावर जोरदार फटका बसला. पाकिस्तानच्या डावाच्या सातव्या षटकात, रिझवानने थेट सिराजकडे चेंडू फेकला होता व त्याला अपेक्षित होते की चेंडू स्टंपच्या दिशेने जाईल कारण तेव्हा फलंदाज क्रीझवर नव्हता. मात्र, चेंडू रिझवानच्या हाताला लागला आणि फाईन लेगला वळला. यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना एक धाव पूर्ण करता आली. सिराजने रिजवानला चेंडू फेकण्याबाबत तात्काळ माफी मागितली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
IND vs PAK Highlights
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या हायलाईट्स पाहिल्यास, भारताने दिलेल्या या १२० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ ११३ धावा करू शकला. जसप्रीत बुमराह संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात १४ धावा देत ३ विकेट घेतल्या, तर हार्दिक पांड्याने २ फलंदाजांना तंबूत धाडले. दुसरीकडे अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली. तर मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नसली तरी त्याने ४ षटकांत १९ धावा देत पाकिस्तानी फलंदाजांना रोखून धरले.
हे ही वाचा<< अमेरिकेतही नितीश कुमारच ‘की’ प्लेअर! एक फटका अन् पाकिस्तानचा डाव उधळला
दरम्यान, भारताच्या यशात मोठा वाटा असणारा गोलंदाज म्हणजेच जसप्रीत बुमराह याने सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना कालच्या सामन्यातील अडथळे व त्यावर मात कशी केली याविषयी सांगितले. बुमराह म्हणाला की, “आता खरंच खूप छान वाटतंय. आम्हाला सुरुवातीला वाटलं की आपण जरा मागे पडतोय पण जसजसा सूर्य बाहेर येत गेला तशी विकेट सुधारत गेली. आम्ही खरोखरच खूप शिस्तीत खेळलो याचा मला आनंद आहे. माझ्याकडून शक्य तितके सीम मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मदत झाली. आम्हाला असं वाटत होतं की, आम्ही भारतामध्येच खेळत आहोत. सध्या दोन सामन्यांमध्ये आम्ही मैदानावर लक्ष केंद्रित केले आहे आणि आम्ही पुढे सुद्धा आमच्या सरावाला व प्रक्रियेला चिकटून खेळात पुढे जाण्याचा प्रयत्न करू.”