IND vs SA, T20 World Cup 2024 Final Preview: यंदाच्या टी-२० विश्वचषकात एकही सामना न गमावलेल्या दोन तगड्या संघांमध्ये म्हणजेच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारताने उपांत्या फेरीत इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानतचा पराभव करत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. शनिवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. बार्बाडोसमध्ये हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाला जवळपास ११ वर्षांपासून कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.

हेड टू हेड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय संघ कायमचं वरचढ राहिला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ २६ वेळा टी-२० फॉर्मेटमध्ये आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला १४ वेळा पराभूत केले आहे, तर ११ सामन्यांमध्ये पराभवाचा पत्करावा लागला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ तटस्थ ठिकाणी दोनदा आमनेसामने आले आहेत. दोन्ही वेळा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे, टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व राखल्याचे या आकडेवारीवरून आपण म्हणू शकतो.

हेही वाचा – IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

सामन्याची वेळ
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना हा २९ जून रोजी शनिवारी खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल. तर फायनल सामन्याची नाणेफेक संध्याकाळी ७.३० वाजता होईल.

पिच रिपोर्ट
भारत दक्षिण आफ्रिका सामना ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हलवर खेळवला जाणार आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषकात आतापर्यंत ८ सामने खेळवले गेले आहेत. ही खेळपट्टी गोलंदाज तसेच फलंदाजासाठीही उपयुक्त आहे. या मैदानावर भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. कॅरिबियन देशांतील इतर मैदानांप्रमाणे या मैदानावर मोठी धावसंख्या पाहायला मिळते. या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपं नाही. अंतिम सामन्यात प्रथम खेळणाऱ्या संघाने १७५पेक्षा अधिक धावसंख्या उभारली, तर ही विजयी धावसंख्या असू शकते.

हेही वाचा – IND vs ENG: “उपर डाला तो देता हूं ना…” हिटमॅन शब्दाचा पक्का, रोहितने सूर्याला सांगून लगावला दणदणीत षटकार; VIDEO व्हायरल

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी या ठिकाणी खेळवलेल्या चार सामन्यांपैकी तीन जिंकले. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. स्कॉटलंड वि इंग्लंड सामना रद्द होण्यापूर्वी स्कॉटलंडने इंग्लंडविरुद्ध १० षटकांत बिनबाद ९० धावा केल्या. ब्रिजटाऊनमधील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने अमेरिकेला ऑल आऊट केले आणि धावांचा सहज पाठलाग करत सामना जिंकला. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत या मैदानावर एकही खेळलेला नाही, परंतु भारताने या मैदानावरील एका सामन्यात अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय मिळवला.

हवामानाचा अंदाज
द वेदर चॅनेलनुसार, बार्बाडोसमध्ये २९ जून रोजी दिवसभर पावसाची शक्यता आहे. पण २९ तारखेला हवामानाचा अंदाज बदलण्याची अपेक्षा आहे. सामन्याच्या दिवशी हवामान स्थितीत बदल झालेला आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळालं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादिवशी पाऊस पडल्यास ३० जून हा रिजर्व डे ठेवण्यात आला आहे. यासह राखीव दिवशीही पाऊस पडला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले आहे.

हेही वाचा – IND vs ENG: रोहित शर्माचा नवा विक्रम, भारताच्या दिग्गज कर्णधारांच्या यादीत मिळवले स्थान

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन माक्ररम (कर्णधाक), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्किया, ओटनील बार्टमन