Shardul Thakur Foot Surgery in London : भारतीय क्रिकेट संघ सध्या अमेरिकेत आहे, जिथे तो २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला आहे. या स्पर्धेतील काही सामन्यांसाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजलाही जाणार आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या एका स्टार ऑलराऊंडरशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता हा खेळाडू पुढील काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे.
स्टार अष्टपैलू खेळाडूवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया –
भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरच्या पायावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली असून तो किमान तीन महिने स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाहेर राहण्याची शक्यता आहे. ३२ वर्षीय शार्दुल ठाकूरने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये ऑपरेशन यशस्वी झाल्याचे लिहिले. त्याच्या पायावर ही दुसरी शस्त्रक्रिया आहे.
याआधी पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याची दुखापत पुन्हा उद्भवली आहे. तथापि, गेल्या मोसमात त्याने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार पुनरागमन केले आणि मुंबईला त्यांचे ४२ वे विजेतेपद पटकावण्यात मदत केली.
आयपीएल २०२४ मध्ये खेळला शेवटचा सामना –
आयपीएल २०२४ च्या नुकत्याच संपलेल्या हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसला होता. शार्दुल ठाकूरने आयपीएल २०२४ मधील नऊ सामन्यांमध्ये ९.७५ च्या इकॉनॉमी रेटने केवळ पाच विकेट्स घेतल्या. शार्दुल हा बीसीसीआयचा ग्रेड सी वार्षिक करार धारक आहे. त्यामुळे त्याच्या उपचाराचा खर्च बोर्डाने उचलला आहे. त्याच्या परतीच्या संदर्भात, या संदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की प्रशिक्षणात परत येण्यासाठी सुमारे तीन महिने लागतील. आगामी देशांतर्गत हंगामापूर्वी किंवा नंतर तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे.