टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सुपर८ गटात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्त्वपूर्ण लढत होत आहे. सेमी फायनल प्रवेशासाठी भारतीय संघाला या लढतीत विजय अनिवार्य आहे. भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये स्थान पटकावले तर ते गयाना इथे होणारी सेमी फायनल खेळतील असं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. भारतीय चाहत्यांना संध्याकाळी प्राईम टाईममध्ये हा सामना पाहता यावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण या सेमी फायनलमागे एक मेख आहे. या सेमी फायनलसाठी रिझर्व्ह डे अर्थात राखीव दिवस नाही.
मोठ्या स्पर्धेत बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद असते. प्रत्येक संघ संघर्ष करत बाद फेरीत पोहोचलेला असतो. पावसाने बाधा आणल्यास सगळ्या मेहनतीवर पाणी फेरू शकतं. हे लक्षात घेऊन सेमी फायनल, फायनल अशा मोठ्या सामन्यांना राखीव दिवसाची तरतूद असते. उदाहरणार्थ २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलचा सामना दोन दिवस खेळवण्यात आला होता. पण वेस्ट इंडिजमध्ये आयोजित टी२० वर्ल्डकपमधल्या गयाना इथे होणाऱ्या सेमी फायनलसाठी राखीव दिवसाची तरतूद नाही.
याचं कारण लॉजिस्टिक्समध्ये आहे. भारत गयाना इथे होणारा सेमी फायनलचा सामना खेळणार हे पक्कं आहे. हा सामना २७ तारखेला होणार आहे. फायनल २९ तारखेला ब्रिजटाऊन इथे होणार आहे. भारतीय संघाच्या सेमी फायनलला राखील दिवस ठेवला तर हा सामना २८ तारखेला खेळवण्यात येईल. पण भारतीय संघाने फायनलमध्ये स्थान पटकावलं तर त्यांना गयानाहून ब्रिजटाऊनला जावं लागेल. त्या प्रवासासाठी पुरेसा वेळ ठेवणं आवश्यक आहे. खेळाडूंच्या बरोबरीने त्यांच्या क्रिकेट साहित्याचं किटही वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. राखीव दिवस ठेवला तर गयाना ते ब्रिजटाऊन प्रवासाचं गणित बिघडू शकतं. हे ध्यानात घेऊन भारताच्या सेमी फायनलला राखीव दिवस देण्यात आलेला नाही.
टी२० वर्ल्डकपच्या प्लेइंग कंडिशन्सनुसार, भारतीय संघाच्या सेमी फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर निर्धारित वेळेपेक्षा २५० मिनिटं अतिरिक्त मिळतील. या अडीचशे अतिरिक्त मिनिटात सामना संपवणं अपेक्षित आहे. स्पर्धेत आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. अशा परिस्थितीत सेमी फायनलसारख्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी राखीव दिवस असणं गरजेचं आहे.