India vs South Africa T20 World Cup Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हा बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर खेळवला जाणार आहे. दरम्यान, सामना सुरु होण्यापूर्वी स्टेडियम बाहेर भारतीय प्रेक्षकांचा उत्साह बघायला मिळतो आहे. हाती तिरंगा घेऊन भारतीय संघ जिंदाबाद अशा घोषणा प्रेक्षांकडून दिल्या जात आहेत.

काही प्रेक्षकांनी यावेळी माध्यमांशी संवादही साधला आहे. आजच्या सामन्यात विराट आणि रोहितकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच भारतीय संघाने पहिले फलंदाजी केली, तर भारतीय संघ १७०-१८० धावा काढेल आणि दक्षिण ऑफ्रिका १५० धावांवर ऑल आऊट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्ता केला. पुढे बोलताना दक्षिण आफ्रिका यांच्या संघाची गोलंदाजी चांगली असून त्यांच्याकडे केशव महाराज, शश्मीसारखे उत्तम गोलंदाज आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे, तर दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानतचा पराभव करत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाला जवळपास ११ वर्षांपासून आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.