Rohit Sharma vs Inzamam Ul Haq Over Team India Ball Tempering Allegations: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज इंझमाम उल हकने भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या उत्तरावर स्पष्टचं भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. इंझमाम उल हकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतावर बॉल टेम्परिंगचा आरोप केला होता. अर्शदीप सिंग ऑस्ट्रेलियाच्या डावातील १५वे षटक टाकत होता. त्या षटकात चेंडू खूप रिव्हर्स स्विंग होत होता. यावरून इंझमामने भारतावर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयानंतर मोठे आरोप केले. रोहित शर्माला पत्रकार परिषदेत यासंबंधित प्रश्न विचारला होता. त्यावर रोहित शर्माने थेट उत्तर देत सांगितलं की थोडं डोकंही वापरलं पाहिजे. रोहितच्या या उत्तरावर इंझमाम यांनी काय उत्तर दिले जाणून घ्या.
इंजमाम उल हक भारतावर आरोप करताना म्हणाले होते, “जेव्हा अर्शदीप सिंग १५वे षटक टाकत होता, तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. चेंडू १५व्या षटकापासूनच रिव्हर्स स्विंग होऊ लागला, याचा अर्थ तो १२व्या-१३व्या षटकापर्यंत तयार केला जात होता. पण अर्शदीप गोलंदाजीला आला तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला, पंचांनी डोळे उघडे ठेवून नीट लक्ष दिले पाहिजे होते. मी हे सांगतोय कारण जर पाकिस्तानने असे केले असते तर गोंधळ झाला असता.”
यावर रोहित शर्माने वेस्ट इंडिजमधील परिस्थिती सांगत चेंडू भारतासह इतर संघांच्या सामन्यांमध्येही स्विंग होत असल्याचे सांगितले. यानंतर रोहितने डोकं वापरणंही गरजेचं आहे असा सल्ला दिला. यावर इंझमाम चिडले असून त्यांनीही भारताच्या कर्णधाराला सुनावले आहे.
इंझमाम उल हक म्हणाला, ‘आम्ही नक्कीच आमचं डोकं वापरू पण पहिली गोष्ट म्हणजे चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता, हे त्याने (रोहित) मान्य केले. म्हणजे आपण जे पाहिलं ते बरोबर आहे. दुसरं म्हणजे, चेंडू रिव्हर्स स्विंग कसा होतो, किती सूर्यप्रकाशात, कोणत्या खेळपट्टीवर हे रोहितला आम्हाला शिकवण्याची गरज नाही. तू अशा व्यक्तीला शिकवू नको ज्याने हे जगाला शिकवलं आहे. त्याला सांगा एखाद्याला असं बोलणं चुकीचं आहे. इंझमामने पाकिस्तानच्या 24 न्यूज एचडीवर हे वक्तव्य केले आहे. हा तोच शो आहे जिथे त्याने पहिल्यांदा भारताविरुद्ध बॉल टेम्परिंगचा मोठा आरोप केला होता.
भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव केला. यासह एकही सामना न गमावता टीम इंडिया टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना बार्बाडोसमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडिया 10 वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. २०१४ मध्ये भारत टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. जिथे त्यांचा श्रीलंकेकडून पराभव झाला होता.