Pakistan Ex Captain Inzmam Ul Haq statement on India of Ball Tampering: टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ मधील तिन्ही सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने आपल्या शेवटच्या सुपर८ सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव केला. हा सामना जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. भारताने या सामन्यात अशी काही कामगिरी केली की गेल्या दोन फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाच जणू भारताने घेतला.
एकीकडे भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचल्याचा आनंद साजरा करत आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचे वक्तव्य व्हायरल झाले आहे. ज्यात त्यांनी ऑस्ट्रेलियावर भारताचा विजय हा फसवणूक करून मिळवल्याचा आरोप केला आहे. इंझमाम-उल-हक यांनी पाकिस्तानच्या स्पोर्ट्स 24 न्यूजशी बोलताना टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाला नियमभंग करून जिंकले असल्याचं म्हटलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने चेंडूशी छेडछाड केल्याचे त्यांचे मत आहे. भारताने बॉल टॅम्परिंग केल्याचे इंझमाम यांचे म्हणणे आहे. त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले माजी क्रिकेटपटू सलीम मलिक देखील इंझमामच्या शब्दांचे समर्थन करताना दिसले.
हेही वाचा – अफगाणिस्तानची प्रगती ‘याचि देही याचि डोळा’ पाहणारा मोहम्मद नबी, जागतिक क्रिकेटमधील अनोखा विक्रमवीर
इंजमाम उल हक भारतावर आरोप करताना म्हणाले, “जेव्हा अर्शदीप सिंग १५वे षटक टाकत होता, तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. चेंडू १५व्या षटकापासूनच रिव्हर्स स्विंग होऊ लागला, याचा अर्थ तो १२व्या-१३व्या षटकापर्यंत तयार केला जात होता. पण अर्शदीप गोलंदाजीला आला तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला, पंचांनी डोळे उघडे ठेवून नीट लक्ष दिले पाहिजे होते. मी हे सांगतोय कारण जर पाकिस्तानने असे केले असते तर गोंधळ झाला असता.”
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या ४१ चेंडूत ९२ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या जलद ३१ धावांमुळे भारताने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या. शिवम दुबे (२८) आणि हार्दिक पंड्या (नाबाद २७) यांच्या योगदानाने भारताच्या खेळीला आणखी बळ दिले. मिचेल स्टार्क (२-४५) आणि मार्कस स्टॉइनिस (२-५६) यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी संघर्ष करताना दिसले. रोहित शर्माने तुफानी फटकेबाजी करत मिचेल स्टार्कच्या एका षटकात २ धावा केल्या.
Inzamam Ul Haq said, "Arshdeep Singh's balls were swinging, something was done to the ball by India". pic.twitter.com/63m1YoW7RE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 26, 2024
भारताने दिलेल्या २०६ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ७ बाद १८१ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ७६ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी, विशेषत: अर्शदीपने ३७ धावा देत ३ विकेट्स घेतले आणि कुलदीप यादवने २ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखून धरले. जसप्रित बुमराह आणि अक्षर पटेल यांनीही महत्त्वपूर्ण विकेट्स घेत भारताने सामन्यावर आपली पकड कायम राखली. दमदार अष्टपैलू कामगिरीसह, भारताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. आता भारताचा सामना गुरुवारी गतविजेत्या इंग्लंडशी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर लढतील.