टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर-८ चे सामने खेळवले जात आहेत. यादरम्यान एक मोठी घटना घडली आहे. स्टार स्पोर्ट्सचा समालोचक असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याच्या मेकअप आर्टिस्टचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच क्रिकेट चाहत्यांना २००७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची आठवण झाली, जेव्हा पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. इरफान पठाण हा मुंबईतील मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारी हा अनेक वर्षांपासून इरफानसोबत काम करत आहे. आता इरफानने त्याला वैयक्तिक मेकअप आर्टिस्ट म्हणून वेस्ट इंडिजला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता.

वेस्ट इंडिजमध्ये इरफानचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून त्याने कामही केले. पण २१ तारखेला अचानक त्याचा पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. हा मेकअप आर्टिस्ट मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नगीना भागातील असून तो अनेक वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झाला. दोन महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. फैयाज याच्या आकस्मिक निधनाची माहिती कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अन्सारी सुमारे दोन दशकांपूर्वी मुंबईत आला, जिथे त्याने स्वतःचे सलून उघडले. यादरम्यान पठाणही मेकअपसाठी त्याच्या सलूनमध्ये येऊ लागला.

हेही वाचा – VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!

फैयाज पठाणसोबत अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर गेला आहे आणि यावेळेस वेस्ट इंडिजचा दौरा होता. शुक्रवार, २१ जून रोजी अन्सारी हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळीसाठी गेला असता तेथे त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार फैयाज अन्सारीचा चुलत भाऊ मोहम्मद अहमद यांने सांगितले की, फैयाज ८ दिवसांपूर्वी नगीनाहून मुंबईला गेला होता आणि तेथून वेस्ट इंडिजला गेला.

मोहम्मद अहमद यांनी सांगितले की, इरफान पठाण स्वत: अन्सारीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबाला खूप मदत करत आहे आणि इरफानच वेस्ट इंडिजमध्ये ही संपूर्ण स्थिती हाताळत आहे. फैय्याजचा मृतदेह दिल्लीला आणायचा आणि तिथून नगिनाला त्याच्या मूळ गावी आणायचा कुटुंबाचा विचार आहे. या प्रक्रियेस ३ ते ४ दिवस लागू शकतात.