Sanjay Manjrekar on Ravindra Jadeja : टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, भारतीय संघ विश्वचषकातील आपल्या मोहिमेची ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या सामन्यापूर्वी शनिवारी भारताने बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यात ऋषभ पंतच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशचा ६० धावांनी पराभव केला. या सामन्यात १७व्या षटकात सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर जडेजा फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर थोडक्यात बचावला. यावेळी कॉमेंट्री करत असलेल्या संजय मांजरेकरांनी एक वक्तव्य केले, जे चर्चेत आहे.
या सामन्यात तनवीर इस्लाम गोलंदाजी करत होता आणि त्याने षटकातील शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ गुड लेंथवर टाकला, ज्यावर जडेजाने स्विप केला पण हा चेंडू त्याला समजला नाही. यानंतर यष्टिरक्षक लिटन दासने लगेच बेल्स उडवत स्टंपिंगचे जोरदार अपील केली. फील्ड अंपायर थर्ड अंपायरकडे वळले आणि मग वेगवेगळ्या कोनातून रिप्ले पाहण्याची प्रक्रिया सुरू झाली. थर्ड अंपायरने अनेक कोनातून रिप्ले पाहिल्यानंतर शेवटी जडेजाला नॉट आऊट देण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान कॉमेंट्री करणारे संजय मांजरेकर असे काही बोलले, ज्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
खरं तर, रवींद्र जडेजा फलंदाजी करत असताना संजय मांजरेकर कॉमेंट्री करत होते. लिटनने जडेजाविरुद्ध स्टंपिंगचे अपील केली, तेव्हा संजय मांजरेकर म्हणाले, “इथून पाहिल्यास तो बाद आहे असे दिसते. पण जडेजा फलंदाजी करत आहे. त्यामुळे मला तोंड बंद ठेवावे लागेल.” मांजरेकरांची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संजय मांजरेकर आणि रवींद्र जडेजा यांच्यातील वाद जुना आहे. दोघांनी सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांविरोधात वक्तव्ये केली आहेत.
हेही वाचा – VIDEO : विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; T20 WC 2024 पूर्वीच आयसीसीकडून मिळाला मोठा पुरस्कार
रवींद्र जडेजाने दिले होते चोख प्रत्युत्तर –
२०१९ च्या विश्वचषकादरम्यान मांजेरकर यांनी जडेजाला सामान्य खेळाडू म्हटल्यावर हा वाद सुरू झाला होता. संजय मांजरेकर म्हणाले होते की “मी बिट्स अँड पीसचा म्हणजे थोडे थोडे योगदान देणाऱ्या खेळाडूंचा चाहता नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जडेजा या स्थानावर आहे. कसोटी सामन्यांमध्ये तो गोलंदाज असतो, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मी फलंदाज किंवा फिरकीपटूला प्राधान्य देईन.” यावर जडेजाने प्रत्युत्तर देताना म्हटले होती, “आताही मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे आणि अजूनही खेळत आहे. त्यामुळे इतर लोकांनी जे साध्य केले त्याचा आदर करायला शिका. मी तुमच्या वर्बल डायरियाबद्दल खूप काही ऐकले आहे.”