Jasprit Bumrah Speaks To ICC Before IND vs SA Finals: सलग दोन वर्षं विश्वचषकाचा अंतिम सामना गाठणारी टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. २९ जूनला टी २० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेतील शेवटचा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगणार आहे. पावसाचे सावट असलेल्या या सामन्यात कुणाचं पारडं जड राहणार हे आज कळेलच. तत्पूर्वी आज टीम इंडियाने फायनलआधीचं सराव सत्र रद्द केल्याचं समजतंय. २७ जूनला भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध सामना खेळला, पावसामुळे हा सामना खूप वेळ चालू राहिला आणि त्यानंतर फक्त एकाच दिवसाच्या ब्रेकनंतर आता भारताला अंतिम सामना खेळायचा आहे. या धावपळीत टीमवर येणारा दबाव लक्षात घेता सराव रद्द करण्यात आला आहे. याबाबत भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसीशी बोलताना काही खास गोष्टींचा खुलासा केला. बुमराहने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाविषयी सुद्धा खास भाष्य केलं आहे. नक्की बुमराह काय म्हणाला? चला पाहूया..
IND vs SA साठी वेळच मिळाला नाही..
बुमराहने अंतिम सामन्याच्या तयारीसाठी कमी वेळ मिळण्यावरून म्हटले की, “कधीकधी तुमच्याकडे खूप वेळ नसतो ही चांगलीच गोष्ट असते. जेव्हा तुम्ही स्वतःचा खूप वेळ प्लॅन करण्यासाठी घालवता तेव्हा मूळ कृती करताना गोंधळ होऊ शकतो. इतकंच नाही तर काही वेळा यामुळे साध्या गोष्टी सुद्धा गुंतागुंतीच्या होऊन बसतात. याउलट जेव्हा अतिविचार करण्यासाठी वेळच मिळत नाही तेव्हा तुम्हाला नेमकं काय करायचंय हे लगेच लक्षात येतं. प्रवास करायचा, प्रवासात आराम करायचा आणि मग पीचवर जाऊन थेट खेळायचं, फार विचार करायचा नाही कारण सगळं नीट होणार आहे असं सूत्र आम्ही फॉलो करतोय.”
रोहित कर्णधार म्हणून कसा आहे? बुमराहचं उत्तर वाचा
दुसरीकडे आयसीसीशी बोलताना जसप्रीत बुमराहने संघाचा कर्णधार रोहित शर्माचं सुद्धा तोंडभरून कौतुक केलं आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहितच्या फलंदाजीने संघाला महत्त्वाच्या सामन्यांमध्ये तारलं आहे. रोहितचं उपांत्य फेरीतील अर्धशतक संघासाठी महत्त्वाचं ठरलं तर सुपर आठच्या टप्प्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली ४१ चेंडूत ९२ धावांची खेळी ही थक्क करणारी होती. सात सामन्यांमध्ये, रोहितने ४१.३३ च्या सरासरीने आणि १५५.९७ च्या स्ट्राइक रेटसह २४८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
कर्णधाराचे कौतुक करताना, वेगवान गोलंदाज बुमराह म्हणाला की, “रोहित शर्माने यंदा अभूतपूर्व कामगिरी केली आहे . आपल्याला माहीत आहे की मागील विश्वचषकातही तो फ्रंट फूटला खेळत होता, तो त्याच्या खेळाडूंना खूप स्वातंत्र्य देतो, तो खेळाडूंना व्यक्त होऊ देतो. वेळ बघून सामन्यादरम्यान स्वतःचा अनुभव शेअर करतो, सल्ले देतो. त्यामुळे खूप छान वाटतं आणि मला त्याच्या हाताखाली खेळताना खूप आनंद होतो. त्याच्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढायला मदत होते.”
दरम्यान, आजच्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात जर पावसामुळे व्यत्यय आला तर फायनलसाठी ३० जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे Accuweather नुसार, (२९ जून) शनिवारी तर ढगाळ वातावरण व काही भागांमध्ये गडगडाटासह संथ वारे वाहणार आहेतच पण राखीव दिवशी सुद्धा पाऊस होऊ शकतो.