IND VS NED K.L.Rahul NOT OUT: भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात भारतीय उपकर्णधार के. एल. राहुल याने पुन्हा एकदा अपयशी खेळी दाखवून आपल्या चाहत्यांना निराश केले. पण राहुलच्या खेळापेक्षा त्याने न घेतलेल्या रिव्ह्यूवरूनच भारतीय क्रिकेटप्रेमी व माजी क्रिकेटपटू संतापले आहेत. के. एल. राहुल १२ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. नेदरलँडच्या पॉल वॅन मीकेरेनच्या गोलंदाजीवर LBW नियमाने राहुल बाद झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र क्रिकेट अभ्यासकांच्या माहितीनुसार राहुल मुळात नाबाद होता, जर भारताने वेळीच रिव्ह्यू घेतला असता तर कदाचित राहुलची विकेट टाळता आली असती. यावरूनच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागनेही के. एल. राहुलला सुनावले आहे.

विरेंद्र सेहवाग म्हणाला की, टी २० विश्वचषकात प्रत्येक खेळाडू हा त्याच्या टॉप फॉर्म मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. वेळीच रिव्ह्यू घेण्याबाबत सांगताना सेहवागने २०११ च्या विश्वचषकातील स्वतःच्या खेळाचे उदाहरण दिले. सेहवागने क्रिकबझला सांगितले की, “एक के. एल. राहुल आहे ज्याने वेळीच DRS घेतला असता तर त्याला आणखीनही धावा करता आल्या असत्या. तो बाद नव्हता!

सेहवाग म्हणाला २०११ मध्ये मी विश्वचषकात स्वतःसाठीच एक नियम बनवला होता जर माझ्या पॅडला बॉल लागला तर मी रिव्ह्यू घेणारच. तीन रिव्ह्यूपैकी एक माझ्यासाठी व एक अन्य १० खेळाडूंसाठी असं मी सांगूनच ठेवलं होतं. इतरांनी त्यांच्या वेळेनुसार ठरवावं पण मी माझा एक रिव्ह्यू घेणारच. जर के. एल राहुल चांगल्या फॉर्म मध्ये होता तर त्याने रिव्ह्यू घ्यायलाच हवा होता पण फॉर्ममध्ये नसतानाही अशी संधी सोडू नये .

दरम्यान, के. एल राहुलचा काल रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय व एकूणच मागील टी २० सामन्यातील खेळ पाहता चाहत्यांची निराशा झाली आहे. यावरून ट्विटरवर अनेकांनी राहुलला संघातून काढून टाकण्याची व त्याच्या जागी पंतला घेण्याचीही मागणी केली आहे.

भारत विरुद्ध नेदरलँड सामना हा तसा एकतर्फीच ठरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली व सामनावीर सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकाने भारताला १७९ धावांचा मोठा पल्ला गाठता आला होता. भारतीय गोलंदाज अक्षर पटेल, अर्शदीप सिंह यांनीही चमकदार कामगिरी केल्याने भारताने तब्बल ५६ धावांच्या फरकाने कालचा सामना आपल्या नावे केला.

T20 Score Board: ४, १, ६.. के. एल. राहुलचा खेळ पाहून चाहते भडकले; मागील 10 टी 20 सामन्यांचा धावांचा तक्ता पाहा

भारताने टी २० विश्वचषकात पाकिस्तान व नेदरलँड असे दोन सलग सामने जिंकले असून ३० ऑक्टोबर रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहेत.

Story img Loader