Kane Williamson Statement on Afganistan: टी-२० विश्वचषक २०२४ मोठा उलटफेर अफगाणिस्तानने केला आबे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा तब्बल ८४ धावांनी मोठा पराभव केला. अफगाणिस्तानचा न्यूझीलंडवर कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिला विजय आहे. याआधी वनडे आणि टी-२० मधील सर्व ४ सामने न्यूझीलंडच्या नावावर होते. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत १०० धावांच्या आतच न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडले. या पराभवानंतर केन विल्यमसनने अफगाणिस्तानचे अभिनंदन केले. पण सामन्यापूर्वीच्या विल्यमसनच्या वक्तव्यामुळे किवी संघाला आपण पराभूत होणार याची आधीच कल्पना होती, हे स्पष्ट होते.
गयाना येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी २० षटकांत ६ बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १५.२ षटकांत अवघ्या ७५ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने ८० धावांची खेळी केली. गुरबाजने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नववे अर्धशतक झळकावले. गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांच्यात १०३ धावांची सलामी भागीदारीही रचली. गोलंदाजीत कर्णधार राशिद खान आणि फजलहक फारुकी यांनी चमकदार कामगिरी करत प्रत्येकी ४ विकेट घेतले.
अफगाणिस्तान संघाचे विल्यमसनकडून कौतुक
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी केन विल्यमसनने म्हटले होते की, “अफगाणिस्तानकडे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे. निश्चितच त्यांच्याकडे अनेक चांगले खेळाडू आहेत. खरं सांगायचे तर त्यांच्याकडे सर्वच चांगले खेळाडू आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांपैकी त्यांच्याकडे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे. अफगाणिस्तानकडे कर्णधार राशिद खान, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद यांच्या रूपाने अव्वल फिरकी गोलंदाज आहेत.”
विल्यमसनने आयपीएलमध्ये राशिद खान आणि नूर अहमद या दोघांसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. गुजरात टायटन्सच्या ताफ्यात हे तिन्ही खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. केन पुढे म्हणाला की, “आम्ही फ्रँचायझी स्पर्धांमध्ये पाहिले आहे की अफगाणिस्तानचे अनेक खेळाडू त्यामध्ये खेळतात आणि त्यांच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. त्यांना मोठ्या स्तरावर खेळण्याची सतत संधी मिळत आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये आपण अफगाणिस्तानची वनडेमधील उत्कृष्ट कामगिरी पाहिली. त्यांचा संघ अतिशय कुशल आहे आणि ते मोठे आव्हान देऊ शकतात.”
हेही वाचा – T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं
विलियसमनचे हे वक्तव्य आता अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर पुन्हा चर्चेत आलं आहे. विल्यमसनने सामन्याआधीच अफगाण गोलंदाजांचे कौतुक केले होते आणि त्यांनीच न्यूझीलंड संघाच्या एकाही खेळाडूला फार काळ मैदानात टिकू दिले नाही.
विजयानंतर विल्यमसनने अफगाणिस्तानचे केले अभिनंदन
अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतरही विल्यमसनने अफगाणिस्तान संघाचे अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. पराभवानंतर किवी कर्णधार म्हणाला, “अफगाणिस्तानचे अभिनंदन, त्यांनी आम्हाला सर्वच बाबतीत सहज मागे टाकले. अशा खेळपट्टीवर विकेट्स राखून त्यांनी धावा केल्या जे खूपच कौतुकास्पद आहे. आम्ही या सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. पण आता पुढील आव्हानासाठी सज्ज व्हायचं आहे. सर्वांनीच फोकस होऊन या सामन्याच्या तयारीसाठी कठोर परिश्रम घेतले होते, परंतु ही आमची सर्वोत्तम कामगिरी नव्हती. आम्ही याबद्दल चर्चा करू, पुनरावलोकन करू आणि त्वरीत पुढच्या आव्हानाकडे वळू. आम्हाला अधिक चांगली कामगिरी करण्याची गरज आहे,”
हेही वाचा – T20 WC 2024 : रोहित शर्माचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! आजपर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम
टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी संघाने युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला होता. यासह अफगाणिस्तानचा संघ क गटात अव्वल स्थानी आहे.