Is the World Cup trophy given to the winning team real : भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे टी-२० विश्वचषक ट्रॉफी देण्यात आली आहे. चांदीची बनलेली ही ट्रॉफी अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील की ही वर्ल्डकप ट्रॉफी कोणाकडे ठेवली जाणार? कर्णधार, प्रशिक्षक की मंडळ? विश्वचषकासाठी संघातील इतर खेळाडूंना कोणते पारितोषिक मिळते आणि ही आयसीसी ट्रॉफी कोणी तयार केली आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण जाणून घेऊया.
ट्रॉफी कोण बनवते?
टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी एकदिवसीय विश्वचषकापेक्षा वेगळी आहे. एकदिवसीय विश्वचषकाची ट्रॉफी सोन्याची आहे. तर टी-२० विश्वचषक ट्रॉफी चांदीची आहे. टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या हंगामात म्हणजे २००७ मध्ये, ही ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या मिनाले ब्राइस डिझाइन स्ट्रॅटेजीने डिझाइन केली होती. विशेष म्हणजे ती अमित पाबुवाल यांनी भारतात तयार केली होती. यानंतर, ती लंडनच्या लिंक्सद्वारे तयार केली जाऊ लागली. २०२१ मध्ये, थॉमस या ट्रॉफीचा अधिकृत निर्माता बनला. ही ट्रॉफी पूर्णपणे चांदी आणि रोडियमची बनलेली आहे. तिचे वजन सुमारे १२ किलो आहे. तिची उंची ५७.१५ सेमी आहे. रुंदी १६.५ सेमी पर्यंत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत १५ ते २० लाख रुपयांपर्यंत आहे.
खरी ट्रॉफी दिली जाते का?
एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणेच टी-२० विश्वचषकाची खरी ट्रॉफीही संघाला दिली जात नाही. आयसीसी ही ट्रॉफी स्वतःकडे ठेवते. तर प्रतिकृती ट्रॉफी (एकसारखी दिसणारी ट्रॉफी) विजेत्या संघाला दिली जाते. प्रत्येक संघांनी जिंकलेल्या खऱ्या ट्रॉफी आयसीसी आपल्या कॅबिनेटमध्ये ठेवते.
प्रतिकृती ट्रॉफी कोणाच्या ताब्यात असते?
विजेत्या संघाला मिळालेली प्रतिकृती ट्रॉफी कोणत्याही खेळाडूला, कर्णधाराला किंवा प्रशिक्षकाला दिली जात नाही. क्रिकेट बोर्ड आपल्या कॅबिनेटमध्ये ठेवते. याआधी भारताने तीन विश्वचषक जिंकले आहेत. यामध्ये २००७ टी-२० विश्वचषक आणि १९८३ आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक यांचा समावेश आहे. क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयनेही हे तीन विश्वचषक आपल्या कॅबिनेटमध्ये ठेवले आहेत. बीसीसीायच नव्हे तर प्रत्येक क्रिकेट बोर्ड हे करतो.
खेळाडूंना काय मिळते?
विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंना अधिकृत प्रमाणपत्रे आणि पदके दिली जातात. यासोबतच विजेत्या संघाला मिळणारी रक्कमही या खेळाडूंमध्ये समान प्रमाणात विभागली जाते. सध्याच्या विश्वचषक विजेत्या संघाला २०.३७ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही विजेत्या संघाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ही सर्व रक्कम संघातील खेळाडूंमध्ये वाटली जाईल. त्याचबरोबर विविध राज्य सरकारेही त्यांच्या खेळाडूंना पुरस्कार देतात. याशिवाय सामना जिंकल्याबद्दल सामनावीरासह इतर पुरस्कारांवरही खेळाडूंचा हक्क असतो.