Kuldeep Yadav Talks To Modi Video: टी २० विश्वचषकात अव्वल ठरलेली टीम इंडिया भारतात परतल्यापासून क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला, आनंदाला पारावार उरलेला नाही. दिल्लीत टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहते विमानतळावर पोहोचले होते तर मुंबईत मरीन ड्राइव्हवर खेळाडूंसाठी चाहत्यांचा महासागर उसळला होता. सेलिब्रेशनच्या आधी टीम इंडियाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळेस मोदींनी हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, अक्षर पटेलसह सर्वच खेळाडूंसह गप्पा मारल्या. भारताचा हरहुन्नरी स्पिनर कुलदीप यादवशी बोलताना मोदींनी त्याला विचारलेल्या प्रश्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. सर्वात आधी कुलदीपशी बोलताना मोदी म्हणाले की, तुला कुलदीप म्हणायचं की, देशदीप? ज्यावर कुलदीपने उत्तर दिले की, मी सगळ्यात आधी देशाचाच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलदीप यादवला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गप्पांच्या सत्रादरम्यान विचारलं की, तुला टीम इंडियाच्या कर्णधाराला नाचवायची हिंमत कशी झाली? तुम्हाला आठवतच असेल जेव्हा भारत विश्वचषक जिंकला आणि विजयी चषक स्वीकारण्यासाठी संघ स्टेजवर जाणार होता तेव्हा कुलदीपने रोहितला एक स्टेप शिकवली होती. कुलदीप हा स्वतः मेस्सी फॅन आहे आणि जेव्हा मेस्सी वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा त्याने ट्रॉफी घेताना स्लो मोशनमध्ये पुढे जाताना एक स्टेप केली होती. हा व्हिडीओ फुटबॉलच्या चाहत्यांमध्ये प्रचंड हिट झाला होता. यावेळेस टीम इंडिया जिंकल्यावर जेव्हा जय शाह व रॉजर बिन्नी हे टीम इंडियाच्या कर्णधाराच्या हाती विश्वचषक सोपवणार होते तेव्हा कुलदीपने ही स्टेप रोहितला शिकवली. याच हलक्या फुलक्या क्षणाचा संदर्भ देत मोदींनी हा प्रश्न कुलदीपला मस्करीत विचारला होता. ज्यावर कुलदीपसह संपूर्ण संघामध्येच हशा पिकला होता.

यावेळी पंतप्रधानांना उत्तर देताना कुलदीपही हसत म्हणाला की, “त्यांनीच मला विचारलं की काहीतरी वेगळं करूया का म्हणून मी त्यांना शिकवायचा प्रयत्न तर केला पण तरीही त्यांनी (रोहितने) ती स्टेप नीट केलीच नाही.” कुलदीपच्या या उत्तर वजा तक्रारीवर मोदी सुद्धा खळखळून हसले.

पंतप्रधान मोदींची कुलदीप यादवला गुगली

दरम्यान, मोदींशी बोलताना कुलदीपने संघातील आपल्या भूमिकेविषयी व विश्वचषकाच्या अनुभवाविषयी सुद्धा भाष्य केले. कुलदीप म्हणाला की, “संघाच्या गरजेप्रमाणे माझी भूमिका असते. कर्णधार व प्रशिक्षक सुद्धा तेच सांगतात की मिडल ओव्हरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त विकेट्स काढायच्या असतात. त्यांचं ऐकून खेळण्याचा प्रयत्न असतो हा माझा तिसरा विश्वचषक आहे आणि त्यात विजयी झाल्याचा प्रचंड आनंद आहे.”

हे ही वाचा<< सूर्यकुमारने कॅच घेताना सीमारेषेचा ब्लॉक शूजने ढकलला का? हा ठोस पुरावा पाहून टीकाकारांचं तोंड होईल बंद, पाहा Video

भारतीय क्रिकेट संघाने १० वर्षांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपवत टी-२० विश्वचषकाचे (२०२४) जेतेपद पटकावलं आहे. विराट कोहलीचं अर्धशतक, सूर्यकुमार यादवचा अफलातूल झेल, जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारत टी-२० चॅम्पियन ठरला. काल, ४ जुलैला टीम इंडिया मायदेशी आपल्या विश्वचषकासह परतली. सर्वात आधी मोदींची भेट घेतल्यावर मग टीम इंडियाने मुंबईत चाहत्यांसह विजयी परेडमध्ये सहभागी होऊन संदर सेलिब्रेशन केले होते.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kuldeep yadav complaints about rohit sharma to narendra modi who asked how dare you make captain dance t20 world cup highlights video svs