Mitchell Marsh confident Australia will be up and about for India : अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता कांगारू संघाचे लक्ष भारताविरुद्धच्या सामन्यावर लागले आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने मोठे वक्तव्य केले आहे. मिचेल मार्श म्हणाला की, त्याचा संघ दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करतो आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवातून सावरेल आणि भारताविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात शानदार पुनरागमन करेल.
आस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. मात्र, ते इतके सोपे असणार नाही. कारण भारतीय संघ आतापर्यंत यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही.टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ सामन्यात ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानकडून २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या त्याच्या आशांना मोठा धक्का बसला. आता या संघाला भारताविरुद्धच्या सुपर-८ मधील शेवटच्या सामन्यात केवळ विजयाची नोंद करावी लागणार नाही, तर नेट रनरेटही चांगला करावा लागेल.
मिचेल मार्श काय म्हणाला?
अफगाणिस्तानविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेत संवाद साधताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला, “हा एक महत्त्वाचा सामना आहे, जो भारताविरुद्ध होणार आहे. यामध्ये आम्हाला कोणत्याही परिस्थिती जिंकावे लागेल. आमच्या संघाचा इतिहास पाहिला, तर आमचे खेळाडू दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करतात. यासाठी आमचे खेळाडू निश्चितपणे पूर्णपणे तयार असतील.”
आम्हाला अवघ्या ३६ तासांत पुनरागमन करण्याची संधी –
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पुढे म्हणाला, “आमच्यासाठी आता गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आमच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत आणि मला विश्वास आहे की आम्ही सर्वोत्तम संघांविरुद्ध आमची सर्वोत्तम कामगिरी दाखवावी लागले. आता आम्हाला मागील सर्व काही विसरून पुढे जायचे आहे आणि आमचे सर्वोत्तम योगदान द्यायचे आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवातून आम्हाला सावरावे लागेल. आम्हाला आमच्या या खेळाडूंवर प्रचंड विश्वास आहे. आमची टीम खूप चांगली आहे, पण आजचा दिवस आमचा नव्हता. सकारात्मक बाब म्हणजे आम्हाला अवघ्या ३६ तासांत पुनरागमन करण्याची संधी मिळत आहे.”
टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेसाठी भारत-ऑस्ट्रेलियाचे संघ –
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
हेही वाचा – Virat Kohli : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात असं काय घडलं, ज्यामुळे विराट स्टेजखाली घुसला, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, ॲश्टन आगर, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.