ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनच्या मैदानावर आयर्लंडचा ४२ धावांनी पराभव करत सामना जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने आयरिश संघाला दोन मोठे धक्के दिले. स्टार्कने आपल्या कोट्यातील पहिल्याच षटकात कर्टिस केम्पर आणि जॉर्ज डॉकरेल यांना त्रिफळाचीत करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयर्लंडच्या डावाच्या चौथ्या षटकात मिचेल स्टार्कने उजव्या हाताचा फलंदाज कर्टिस केम्परला त्याच्या दुसऱ्या चेंडूवर आतल्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. या षटकातील शेवटच्या चेंडूवर स्टार्कने पुन्हा एकदा आपला वेग आणि स्विंगचा जलवा दाखवला.
यावेळी जॉर्ज डॉकरेल स्ट्राइकवर होता. मिचेल स्टार्कने कर्टिस केम्परप्रमाणेच जॉर्ज डॉकरेलची शिकार केली. स्टार्कच्या हातातून चेंडू सुटताच फलंदाजाला चकवत यष्टीवर जाऊन आदळला. त्यामुळे जॉर्ज डॉकरेल खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
सामन्याबद्दल बोलायचे तर, ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४२ धावांनी विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघासमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु आयर्लंडचा संघ १३७ धावांवर आटोपला. आयर्लंडकडून लॉर्कन टकरने एकाकी झुंज देताना अर्धशतक झळकावले.