टी-२० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर, देशाच्या माजी क्रिकेटपटूंनी खराब कामगिरीबद्दल संघ व्यवस्थापन, पीसीबी अध्यक्षांची निंदा केली. तसेच ऑस्ट्रेलियातील मेगा स्पर्धेसाठी निवडकर्त्यांच्या खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. झिम्बाब्वे संघाने गुरुवारी पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सुपर-१२ सामन्यात पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला.
पाकिस्तानचा दोन सामन्यांतील हा दुसरा पराभव असल्याने त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग आता कठीण झाला आहे. रविवारी त्यांच्या मोहिमेच्या पहिल्या सामन्यात त्यांना कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून पराभव पत्करावा लागला होता.
माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा आणि मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम यांच्यावर टीका केली. आमिरने ट्विटरवर लिहिले, “मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की खराब निवड झाली, आता पराभवाची जबाबदारी कोण घेणार? मला वाटते की पीसीबीचा देव आणि तथाकथित मुख्य निवडकर्ता असलेल्या तथाकथित अध्यक्षापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे.”
दरम्यान, शोएब अख्तरने कर्णधार बाबर आझमपासून पीसीबी अध्यक्ष रमीझ राजापर्यंत संपूर्ण सेटअपला पराभवासाठी जबाबदार धरले आहे. तो म्हणाला, “मी पुन्हा पुन्हा सांगतोय, या स्तरावर यश मिळवण्यासाठी हे सलामीवीर, मिडल ऑर्डर पुरेसा नाही. मी काय सांगू शकतो?”
शाहिद आफ्रिदीनेही ट्विट करून लिहिले की, ”मी याला उलटसुलट म्हणणार नाही. कारण तुम्ही सामना पाहिला असेल तर पहिल्याच चेंडूपासून झिम्बाब्वेने अव्वल क्रिकेट खेळले. फलंदाजीच्या खेळपट्टीवर कमी धावसंख्येचा बचाव कसा करायचा हे त्याने दाखवून दिले. तुम्ही तुमची जिद्द आणि मेहनत दाखवली आहे, झिम्बाब्वेच्या विजयाबद्दल अभिनंदन.”