Mohammad Hafeez shares cryptic tweet after Pakistan’s early T20 World Cup exit : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेतील पाकिस्तानचा पुढचा प्रवास संपला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानचे सुपर ८ मध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीजने टी-२० विश्वचषकातून संघ लवकर बाहेर पडल्याबद्दल जोरदार टीका केली आहे.
मोहम्मद हाफिज पाकिस्तान संघावर संतापला –
मोहम्मद हाफिज पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा संचालकही राहिला आहे. मात्र, तीन महिन्यांतच त्याला संचालकपदावरून हटवण्यात आले होते. पाकिस्तानला या विश्वचषकातील शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे पण हा सामना केवळ औपचारिकता आहे. तत्पूर्वी त्याने पाकिस्तान संघाला सुपर ८ फेरीत पोहोचू न शकल्याने घरचा आहेर दिला आहे. मोहम्मद हाफीजने पाकिस्तान संघावर सडकून टीका केल्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोहम्मद हाफीजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहले, ‘कुर्बानी के जानवर हाजिर हों.’ या पोस्टचा स्पष्ट अर्थ असा आहे की विश्वचषकात आपल्या संघाच्या खराब कामगिरीमुळे तो प्रचंड संतापला आहे. हाफिजच्या या पोस्टवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा – कामरान अकमलचा पुन्हा एकदा वाचाळपणा; म्हणाला, ‘विराट कोहलीपेक्षा उमरची आकडेवारी चांगली…”, पाहा VIDEO
या विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. अमेरिकेने त्यांना पराभूत करून मोठी खळबळ निर्माण केली, तर भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तान संघ आपल्या चौथ्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात आयर्लंडशी भिडणार आहे. मात्र या सामन्याचा दोन्ही संघांवर कोणताही परिणाम होणार नाही कारण दोघेही स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
पीसीबीने आमिर आणि इमादची निवृत्ती केली होती रद्द –
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही टी-२० विश्वचषकासाठी दोन खेळाडूंना निवृत्त निवृत्ती मागे घेण्यास सांगितले होते. पीसीबीने मोहम्मद आमिर आणि गेल्या वर्षी निवृत्त झालेली इमाद वसीम यांचा संघात समावेश केला होता. या दोन्ही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक होती. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आमिरने सुपर ओव्हरमध्ये १८ धावा दिल्या, तर भारताविरुद्धच्या सामन्यात इमाद वसीमला काही विशेष प्रदर्शन करता आले नाही. या खेळाडूंच्या पुनरागमनामुळे दिग्गज क्रिकेटपटूही चांगलेच संतापले आहेत.