Monank Patel ruled out of India clash due to shoulder injury : टी-२० विश्वचषक २०२४ चा २५वा सामना आज भारत आणि अमेरिका यांच्यात होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी अमेरिकन संघाला एक मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन संघाचा नियमीत कर्णधार मोनांक पटेल दुखापतीमुळे या सामन्याला मुकला आहे. त्यामुळे नाणेफेकीच्या वेळेला कर्णधार रोहित शर्मासह तो उपस्थित नव्हता. म्हणून त्याच्या जागी आरोन जोन्स नाणेफेकीसाठी आला होता. या सामन्याची नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्मासह नाणेफेकीला आलेल्या आरोन जोन्सने मोनांक पटेलच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. आरोन जोन्स नाणेफेक गमावल्यानंतर म्हणाला, “आम्ही नाणेफेक जिंकली असती, तरी आधीही गोलंदाजी केली असती. कारण या मैदानावर गोलंदाजांना सुरुवातीला थोडी मदत मिळते. मोनांक पटेलला दुखापत झाली असून तो लवकर बरा झाला पाहिजे. हा एक महत्त्वाचा सामना आहे, त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु. आमचा संघ या सामन्याबाबत खूप सकारात्मक आहे. आजच्या सामन्यासाठी आम्ही संघात दोन बदल केले आहेत. मोनांकच्या जागी शायान जहांगीर आणि नोस्ताहशच्या जागी शेडलीचा समावेश करण्यात आला आहे.”
अमेरिकन संघात अनेक भारतीय वंशाचे खेळाडू –
अमेरिकेचा संघ दुसऱ्या भारतीय संघासारखा दिसतो. कारण त्यात भारतीय वंशाचे आठ खेळाडू आहेत. याशिवाय पाकिस्तानी वंशाचे दोन खेळाडू आणि वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचा एक खेळाडू या संघाचा भाग आहे. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवूनही अमेरिकेच्या खेळाडूंची फारशी चर्चा होत नसली तरी भारताविरुद्धची चांगली कामगिरी त्यांना क्रिकेट विश्वात ओळख मिळवून देऊ शकते. मोनांक पटेल, हरमीत, नेत्रावलकर, जेसी सिंग आणि नोष्टुश केंजिगे यांच्या स्वतःच्या कथा भारताशी संबंधित आहेत.
हेही वाचा – T20 WC 2024 : ‘क्रिकेट आता एक व्यवसाय झालाय…’, आयपीएलबद्दल माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
अमेरिका: स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रियास गौस (यष्टीरक्षक), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन साल्विक, जसदीप सिंग, सौरव नेत्रावलकर, अली खान.