पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सध्या सानिया मिर्झाबरोबरच्या घटस्फोटांच्या चर्चांमुळे बातम्यांमध्ये सतत झळकणाऱ्या शोएब मलिकने २००७ च्या पहिल्या टी-२० विश्वचषकासंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. भारताने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला पराभूत करत जिंकलेल्या या स्पर्धेमधील एक गुपित शोएबनं उघड केलं आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडने यंदाच्या म्हणजेच २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये शोएबने या २००७ च्या विश्वचषकासंदर्भात खुलासा केलाय.
नक्की वाचा >> T20 World Cup Final: …म्हणून इंग्लंडच्या संघातील खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरले
टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच अंतिम सामन्यामध्ये कोणताही वरिष्ठ भारतीय गोलंदाज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अंतिम षटक टाकण्यासाठी तयार नव्हता. मिसाब उल हक फलंदाजी करत असल्याने भारतीय वरिष्ठ गोलंदाज अंतिम षटक टाकण्यास तयार नव्हते. त्यामुळे धोनीला नाइलास्तव तुलनेनं कमी अनुभव असलेल्या जोंगिंदर शर्माला गोलंदाजी करण्यास सांगावं लागल्याचा दावा शोएबनं केला आहे.
शोएब मलिक टी-२० विश्वचषक स्पर्धेनिमित्त अ स्पोर्ट्स या एका क्रिडा विषयक चॅनेलबरोबर बोलत असताना त्याने ही आठवण सांगितली. १५ वर्षांपूर्वी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात शोएब पाकिस्तानी संघाचं नेतृत्व करत होता. तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारत अंतिम सामन्यात पोहोचला होता. भारताने अंतिम सामना पाच धावांनी जिंकला होता. शेवटच्या षटकामध्ये पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची गरज होती. मात्र पाकिस्तानकडे एकच विकेट बाकी होती. मात्र या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या विजयाची शक्यता अधिक होती. मिसाब उल हक चांगली फलंदाजी करत होता आणि चेंडू दूर दूर पर्यंत टोलवत होता. त्यामुळेच पाकिस्तान हा सामना जिंकणार असं मानलं जात होतं.
नक्की पाहा >> World Cup Final: बाबर आझमला रशीदने फिरकीत गुंडाळला; स्वत:च्याच गोलंदाजीवर टीपला अप्रतिम झेल, पाहा Video
मलिकने भारतीय गोलंदाजांची नाव सांगण्यास नकार दिला मात्र या वरिष्ठ गोलंदाजांनी शेवटचं षटक टाकण्यास नकार दिल्याचा दावा केला. तसेच पाकिस्तानच्या हातात एकाहून अधिक विकेट्स असत्या तर ज्या स्कूप शॉटच्या फटक्यावर मिसाब बाद झाला तो फटका मिसाब खेळलाच नसता असाही दावा केला आहे. अधिक एक विकेट हातात असती तर मिसाबने सरळ फटके मारले असते असं शोएब म्हणाला.
मिसाब स्वत: या कार्यक्रमामध्ये शोएबबरोबर सहभागी झाला होता. आपण स्कूप शॉट का मारला याबद्दल सांगताना मिसाबने शॉट फाइन लेगचा फिल्डर ३० मीटरच्या सर्कलमध्ये उभा होता. त्यामुळे चेंडू त्याच्या डोक्यावरुन पलिकडे गेला असता तर चौकार मिळाला असता असा विचार असल्याने तो फटका मारल्याचं मिसाबने सांगितलं. मात्र तसं घडलं नाही आणि श्रीशांतने मिसाबचा झेल घेतला. मिसाब बाद झाल्याने भारताने दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.