MS Dhoni praises Indian team for winning T20 World Cup 2024 : भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत ८ गडी गमावून १६८ धावा करता आल्या. या विजयासह रोहित शर्माच्या भारतीय संघाने ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. यानंतर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने रोहितच्या सेनेने केलेले कामगिरीचे कौतुक केले आहे.

भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये शेवटचा टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यासह टीम इंडिया टी-२० विश्वचषक दोनदा जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिज (२०१२, २०१६) आणि इंग्लंड (२०१०, २०२२) मध्ये ही कामगिरी केली होती.

एमएस धोनीकडून रोहित शर्माच्या संघाचे कौतुक –

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहले, “टीम इंडिया विश्वविजेते! फायनल पाहताना माझे हृदयाचे ठोके वाढले होते. दडपणाच्या स्थितीत शांत राहून, स्वत:च्या कौशल्यांवर विश्वास ठेऊन तुम्ही विजयश्री खेचून आणलीत. याकरता तुमचं मनापासून अभिनंदन. वर्ल्डकप पुन्हा भारतात आणल्याबद्दल समस्त भारतीयांच्या वतीने धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!”

रोहित शर्मा दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू –

टीम इंडियाने २००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर संघाची कमान एमएस धोनीच्या हातात होती. त्यानंतर भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. यावेळी दक्षिण आफ्रिकेची पाळी होती. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा रोहित शर्माही त्या संघाचा सदस्य होता. तेव्हापासून आतापर्यंत रोहित शर्मा प्रत्येक टी-२० विश्वचषक खेळला आहे, पण चॅम्पियन होऊ शकला नाही. पण आता तब्बल ११ वर्षांनंतर त्याला हा दिवस पाहण्याची संधी मिळाली आहे. टी-२० विश्वचषक दोनदा जिंकणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी तो केवळ खेळाडू म्हणून खेळला होता, मात्र यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक जिंकला आहे.