Naseem Shah crying after Pakistan lost by 6 runs : रविवारी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या हाय-व्होल्टेज लढतीत भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. टीम इंडियाविरुद्धचा अत्यंत थोडक्यात सामना गमावल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह मैदानावरच रडू लागला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला रडताना पाहून भारतीय कर्णधार रोहित शर्माही त्याचे सांत्वन करताना दिसला. या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी १२० धावांचे सोपे लक्ष्य होते, परंतु भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला ११३ धावांवर रोखले.
पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या ६ चेंडूत १८ धावांची गरज होती, त्यांना या धावा करता आल्या असत्या. त्यावेळी पाकिस्तानकडून इमाद वसीम आणि नसीम शाह क्रीजवर उपस्थित होते. अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर इमाद वसीमला (१५) बाद करून पाकिस्तानच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. यानंतर नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानला विजयापर्यंत नेण्याची संधी होती. नसीम शाहनेही शेवटच्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर लागोपाठ दोन चौकार मारले, पण तरीही पाकिस्तानने सामना गमावला.
अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात आपली जादू दाखवत शेवटच्या षटकात केवळ ११ धावा दिल्या. भारताविरुद्धचा हा सामना ६ धावांनी हरल्यानंतर नसीम शाह अचानक रडायला लागला. शाहीन शाह आफ्रिदीने नसीम शाहला सावरण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही नसीम शाहच्या खांद्यावर हात ठेवून शांत करण्याचा प्रयत्न केला. नसीम शाहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गोलंदाजांनी भारताला मिळवून दिला विजय –
ऋषभ पंतच्या लढाऊ खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. भारताच्या केवळ १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराह (१४ धावांत तीन विकेट) आणि हार्दिक पंड्या (२४ धावांत दोन विकेट) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ सात गडी गमावून बाद ११३ धावाच करू शकला. अक्षर पटेल (११ धावांत एक विकेट) आणि अर्शदीप सिंग (३१ धावांत १ विकेट) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी करताना चार षटकांत केवळ १९ धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने (३१) सर्वाधिक धावा केल्या. मात्र, त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला १५ धावांचा टप्पाही पार करता आला नाही.
हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवाचं नेमकं कारण काय? बाबर आझम म्हणाला, “भारताविरुद्धच्या सामन्यात आम्ही…”
ऋषभ पंतच्या खेळीने भारताला तारले –
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ १४ षटकांत ३ बाद ८० धावा करून एकवेळ चांगल्या स्थितीत होता, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत भारताला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, नसीम शाह (२१ धावांत तीन विकेट) आणि हारिस रौफ (२१ धावांत तीन विकेट) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचा डाव १९ षटकांत ११९ धावांत गारद झाला. मोहम्मद आमिरने २३ धावांत दोन तर शाहीन शाह आफ्रिदीने (२९ धावांत एक विकेट) एक बळी घेतला. भारताकडून पंतने ३१ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्यांच्याशिवाय अक्षर पटेल (२०) आणि कर्णधार रोहित शर्मा (१३) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. भारताने फक्त ३० धावा जोडून शेवटचे सात विकेट्स गमावल्या.