भारताविरोधातील वक्तव्यांमुळे चर्चेत असलेला इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने पुन्हा एकदा टीम इंडियाविरोधात वक्तव्य केले आहे. आयसीसी मालिकेमधील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल त्याने आपले मत मांडले आहे. तो म्हणतो की, टीम इंडिया आयसीसीच्या स्पर्धांमध्ये घाबरटासारखी खेळते. याच कारणामुळे त्यांनी २०१३ पासून एकही स्पर्धा जिंकलेली नाही. २००७ नंतर प्रथमच आयसीसी टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाचे लक्ष लागले आहे. १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात उतरणार आहे. २३ ऑक्टोबरला टीम इंडिया प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळत मोहिमेला सुरुवात करेल.
नासिर म्हणाले, “भारतीय संघाने अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत, पण जेव्हा आयसीसीचा विचार केला तर हा संघ भित्रा दिसतो. खेळाडू घाबरून दबावात खेळतात. त्यामुळे तो मोठ्या स्पर्धा जिंकत नाही. या संघाला आयसीसी स्पर्धा जिंकायची असेल, तर उणीवा दूर करून आत्मविश्वासाने खेळावे लागेल. तसे पाहता भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून चांगले क्रिकेट खेळत आहे. विशेषत: २०२२ मध्ये चांगला खेळ केला, पण नुकत्याच झालेल्या आशिया चषकामध्ये टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब होती. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून श्रीलंकेने विजेतेपद पटकावले.”
हेही वाचा : Women’s T20 Asia Cup: ठरलं! भारताविरुद्ध हा संघ भिडणार आशिया चषकाच्या फायनलमध्ये
नासिर हुसैन यांनी स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, ‘आयसीसी स्पर्धा ही भारतासमोर मोठी समस्या आहे. त्याच्याकडे चांगले खेळाडू आहेत, ज्यांना ते आळीपाळीने फिरवत राहतात आणि विश्रांती देत असतात. यासह टीम इंडियाने प्रत्येक क्षेत्रात सर्वांना पराभूत केले आहे. पण जागतिक स्पर्धांमध्ये (मोठ्या स्पर्धांमध्ये) ते स्वतःच्या कोषात जाऊन स्वतःलाच अडचणीत टाकतात आणि पराभव अंगावर ओढवून घेतो. माजी इंग्लिश कर्णधार पुढे म्हणाला, ‘गेल्या विश्वचषकात, विशेषत: पॉवरप्लेमध्ये त्यांनी काही धाडसी पद्धतीने खेळही दाखवला आहे, असे म्हणावे लागेल. टीम इंडियामध्ये आक्रमक खेळी खेळण्याची क्षमता आहे. सूर्यकुमार यादव शानदार फॉर्मात आहे. मात्र, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दोन स्टार खेळाडू संघाबाहेर आहेत. द्विपक्षीय मालिकेत जी मानसिकता ठेवतात तीच मानसिकता टीम इंडियाला ठेवावी लागेल.”
हेही वाचा : Kamalpreet Kaur: उत्तेजक सेवनप्रकरणी भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर तीन वर्षांची बंदी
२९ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण ४५ सामने खेळवले जाणार आहेत. संघांबद्दल बोलायचे झाले तर १६ देश यात सहभागी होत आहेत. सुपर-१२ मध्ये आठ संघांना सरळ स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर आठ संघ पहिल्या फेरीत खेळतील. तेथे चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातील अव्वल २ संघ सुपर-१२ मध्ये प्रवेश करतील. १६ ऑक्टोबरपासून पहिल्या फेरीचे सामने खेळवले जातील. त्याचवेळी २२ ऑक्टोबरला सुपर-१२ सुरू होणार आहे.