T20 World Cup SA vs NED: टी २० विश्वचषकात सर्वच सामन्यांमध्ये अनपेक्षित खेळ पाहायला मिळाले आहेत. आज सुपर १२ सामन्यातील भारत, पाकिस्तान, व दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे सामने नियोजित होते. सकाळीच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड सामन्यात संपूर्ण विश्वचषकात दुबळ्या ठरलेल्या नेदरलँडच्या संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांचे लक्ष्य दिले होते. टी २० विश्वचषकातील अनुभवी दक्षिण आफ्रिकेसाठी हे लक्ष्य फार मोठे नव्हते पण आज नेदरलँडच्या गोलंदाजांनी अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली व १३ धावांच्या आघाडीने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला.
T20WC मधून दक्षिण आफ्रिकेचं नशीब पाकिस्तानच्या हाती
नेदरलँड विरुद्ध पराभवानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी पाकिस्तानच्या खेळावर अवलंबून राहावे लागणार आहे. आज पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश या सामन्यात जर बांग्लादेशचा विजय झाला तर दक्षिण आफ्रिका ५ पॉईंटसह टी २० विश्वचषकात उपांत्य फेरीत जाऊ शकेल तर पाकिस्तान नेट रन रेट अधिक असूनही विश्वचषकातून एका पॉईंटच्या फरकाने बाहेर पडेल. मात्र जर पाकिस्तानचा विजय झाला तर ६ पॉईंटसह पॉईंट टेबल मध्ये दुसऱ्याच स्थानी पोहोचेल व थेट उपांत्य फेरीत दाखल होईल.
T20WC मध्ये पाकिस्तानची संधी वाढली
दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी आजचा नेदरलँड विरुद्ध पराभव हा जिव्हारी लागणारा ठरला आहे, मुख्य म्हणजे यापूर्वी भारतासारखा बलाढ्य संघही आफ्रिकेला हरवू शकला नव्हता पण मागील दोन सामने हे दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का ठरले. सुरुवातीला पाकिस्तान विरुद्ध व आता तर पॉईंट टेबल मध्ये सर्वात खाली असणाऱ्या नेदरलँडनेही दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड सामन्याचे हायलाईट्स
दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड सामन्यात आज सुरुवातीला नेदरलँडने फलंदाजी करून १५८ धावा केल्या होत्या. नेदर्लंडच्या कॉलिनने ४१ धावांची नाबाद खेळी खेळली. तर स्टिफन मायबर्ग व टॉम कूपर यांनी अनुक्रमे ३७ व ३५ धावा केल्या आहेत. आफ्रिकेच्या केशव महाराज या गोलंदाजाने २ विकेट घेतल्या मात्र आज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची जादू दिसली नाही. १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडच्या गोलंदाजीचा फटका दक्षिण आफ्रिकेला बसला. दक्षिण आफ्रिकेने वेळोवेळी विकेट्स गमावल्या. शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडूंमध्ये २६ धावा हव्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ १२ धावा करता आल्या.