West Indies beat Australia in warm up match : टी २० विश्वचषक २०२४ आयपीएल संपल्यानंतर लगेचच सुरू होत आहे आणि अनेक खेळाडू आयपीएलमध्ये त्यांच्या दमदार फॉर्मसह या स्पर्धेत उतरणार आहेत. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ट्रॅव्हिस हेड, जोस बटलर यांसारख्या खेळाडूंवर बहुतेकांची नजर आहे, पण सर्वप्रथम वेस्ट इंडिजच्या दिग्गजांनी आपली क्षमता दाखवली आहे. आयपीएलमध्ये लखनऊ संघासाठी खेळणाऱ्या निकोलस पुरनने स्पर्धेपूर्वी सराव सामन्यात आपले कौशल्य दाखवले आणि जबरदस्त चौकार-षटकारांचा पाऊस पाडत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली.
पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या या सराव सामन्यात दोन्ही संघांनी धावांचा पाऊस पाडला. वेस्ट इंडिजने पूर्ण ताकदीनिशी प्रवेश केला होता, पण ऑस्ट्रेलियन संघ आपल्या काही आयपीएल स्टार्सशिवाय सामन्यात उतरला. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ट्रॅव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे दिग्गज खेळाडू या सामन्यापासून दूर राहिले. तरीही सामना रोमांचर झाला आणि दोन्ही संघाच्या फलंदाजांनी भरघोस धावा केल्या.
पुरनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली –
वेस्ट इंडिजच्या प्रत्येक फलंदाजांने मैदानात येताच आक्रमक फलंदाजी करण्यावर लक्ष केंद्रित केले. पण लक्ष वेधून घेतले निकोलस पूरनने, त्याने डावाची सुरुवात षटकाराने केली. पुरनने पहिल्या ४ चेंडूत सलग ३ षटकार आणि एक चौकार लगावला. पुरनने अवघ्या १६ चेंडूत आपले धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही त्याचे आक्रमण सुरूच राहिले आणि अखेर ३०० च्या स्ट्राईक रेटने अवघ्या २५ चेंडूत ७५ धावा करून तो बाद झाला. पुरनने आपल्या खेळीत ८ षटकार आणि ५ चौकार लगावले.
हेही वाचा – T20 WC 2024 : ‘या’ स्टार खेळाडूचं विश्वचषक खेळणं कठीण, अमेरिकेने व्हिसा देण्यास दिला नकार, काय आहे प्रकरण?
केवळ पूरनच नाही तर आयपीएलमध्ये काही छोट्या पण महत्त्वाच्या खेळी खेळणारा वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलनेही २५ चेंडूत ५२ धावा केल्या, तर केकेआरकडून एकही सामना न खेळलेल्या शेरफेन रदरफोर्डने अवघ्या १८ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकार मारत ४७ धावा केल्या. अशा प्रकारे वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ गडी गमावून २५७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचे जोरदार प्रत्युत्तरही ठरले नाही पुरेसे –
वेस्ट इंडिजप्रमाणे ऑस्ट्रेलियानेही दमदार सुरुवात केली. फिरकीपटू ॲश्टन अगरला सलामीला पाठवत ऑस्ट्रेलिया संघाने सर्वांना आश्चर्यचकित केले. आगरनेही १३ चेंडूत २८ धावा करत हा निर्णय योग्य सिद्ध केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श केवळ ४ धावा करून बाद झाला आणि त्याचा परिणाम ऑस्ट्रेलिया संघावर दिसून आला. जोश इंग्लिस आणि नॅथन एलिससह मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी वेगवान खेळी खेळल्या पण संपूर्ण संघ केवळ २२२ धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि ३५ धावांनी पराभूत झाला.