USA vs PAK, T20 World Cup, Nitish Kumar: भारतात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि टी २० विश्वचषकातील अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर सर्वत्र एकाच नावाची चर्चा आहे, ते नाव म्हणजे नितीश कुमार. अमेरिकेच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करून टी २० विश्वचषकात मोठा ट्विस्ट आणलाय. नवखे म्हणून ओळखले जाणारे संघ सुद्धा तगडं आव्हान देऊ शकतात हे युएसए विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाहायला मिळालं. याच सामन्यात बाजी पालटणारा खेळाडू ठरला नितीश कुमार. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावांची मजल मारली होती. आव्हान पूर्ण करताना शेवटच्या चेंडूपर्यंत निकाल पाकिस्तानच्या बाजूने दिसत होता. अमेरिकेला जिंकण्यासाठी एका चेंडूत पाच धावांची गरज होती, पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ हातात चेंडू घेऊन सज्ज होता, समोर नितीश कुमार क्रीझवर होता. फार फार एक दोन धावा मिळतील अशी अपेक्षा असतानाच नितीशने एका फटक्यात चेंडूला सीमारेषा दाखवली आणि सामना टाय केला. खेळाचा निकाल पालटणारा हा क्षण सध्या चर्चेत आहेच पण त्याबरोबरीने या नितीश कुमारच्या संघ बदलाचा इतिहास सुद्धा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहे नितीश कुमार?

पाकिस्तानच्या समोर १४ चेंडूत १४ नाबाद धावा करणारा नितीश कुमार हा १६ व्या वर्षापासून विश्वचषक खेळत आलाय. स्कारबोरो, ओंटारियो, कॅनडा येथे भारतीय वंशाच्या पालकांच्या पोटी जन्मलेल्या, नितीशचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं आहे. तिथेच तो क्रिकेट खेळला. लॉफबरो येथे शिकत असताना, त्याने २०१७ मध्ये नॉटिंगहॅमशायर विरुद्ध तीन दिवसांच्या सामन्यात जलद १४१ धावा करत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचे वडील स्वतः टोरंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लबमध्ये क्रिकेट खेळले होते. १९९८ मध्ये फक्त चार वर्षांचा असताना त्याला पालकांनी टोरंटो क्रिकेट अकादमीमध्ये पाठवले. अनेकांना माहित नसलेली एक गोष्ट म्हणजे नितीशची फलंदाजी ही काही प्रमाणात सचिन तेंडुलकरशी जुळती असल्याने त्याला तेंडुलकर या टोपणनावाने सुद्धा हाक मारली जाते.

याविषयी नितीशने espncricinfo साईटला सांगितलं होतं की, सचिन त्याचा आवडता खेळाडू आहे. तो व्हिडीओ पाहून त्याची स्टाईल कॉपी करायचा, पण नेमकं कुणी त्याला तेंडुलकर हे टोपणनाव दिलं हे नीटसं आठवत नाही. सचिनच्या पॅड बांधण्याच्या स्टाईलपासून ते बॅटिंगपर्यंत सगळं काही कॉपी करायचो अशी कबुली सुद्धा नितीशने espn शी बोलताना दिली होती.

नितीश २००९ ते २०१३ या कालावधीत ICC कॉन्टिनेंटल कपमध्ये कॅनडाकडून खेळला होता. २०१० मध्ये त्याने कॅनडाकडूनच अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो कॅनडासाठी १६एकदिवसीय आणि १८ टी-20 सामने खेळला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याने कॅनडाच्या बाजूने शेवटचा सामना खेळला होता तर एप्रिल २०२४ मध्ये त्याने अमेरिकेच्या संघातून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता योगायोग म्हणजे हा सामना सुद्धा त्याला कॅनडाच्या विरुद्ध खेळावा लागला.

दरम्यानच्या काळात यूएसएच्या संघात पात्र होण्यासाठी आवश्यक औपचारिकता (व्हिसा, ग्रीन कार्ड) यासाठी प्रतीक्षा करत असताना तो तो फेब्रुवारी २०२१ मध्ये वेस्ट इंडिजच्या देशांतर्गत लिस्ट ए टूर्नामेंट सुपर ५० कपमध्ये खेळण्यासाठी कॅरिबियनला गेला. नितीश हा आयसीसी अमेरिका व कॅनडा या दोन्ही संघांकडून कॅरिबियन येथील सामने खेळला आहे. आता तो पूर्णपणे अमेरिकेच्या संघाचा भाग आहे.

हे ही वाचा<< पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या सौरभ नेत्रावळकरचं लिंक्डइन पेज पाहून चाहते थक्क; म्हणाले, “यार डिलीट कर, माझे..”

नितीश कुमारचा कॅनडा- अमेरिका- कॅनडा आणि पुन्हा अमेरिका प्रवास कमी अधिक प्रमाणात राजकारणातील नितीश कुमार यांच्या पक्षबदलाच्या स्थितीशी मिळता जुळता असल्याने सोशल मीडियावर या एकाच नावाच्या दोघांची चर्चा होतेय. स्वतः सेहवागने सुद्धा यापूर्वी गमतीत क्रिकबझवरील चर्चेदरम्यान, “नितीश कुमार हे नाव सध्या खूप महत्त्वाचं आहे” असं म्हटलं होतं ज्यावर उत्तर देताना शो चा होस्ट गौरव कपूरने, “कुणी असो किंवा नसो प्लेइंग ११ मध्ये नितीश कुमार हे नाव लागतंच नाहीतर संघच बनू शकत नाही”, अशी मस्करी केली होती

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar turns pakistan down become key player of usa vs pak t20 world cup match how people are relating politician nitish with cricketer svs