Vikram Rathour’s reaction to Virat Kohli’s form : टी२० विश्वचषक २०२४ मध्ये विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. सलामीवीर म्हणून या स्पर्धेत किंग कोहलीची बॅट आतापर्यंत शांत राहिली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने आयर्लंडविरुद्ध १ धावा आणि पाकिस्तानविरुद्ध ४ धावा केल्या, तर अमेरिकेविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. सुपर-८ सामन्यांपूर्वी विराट कॅनडाविरुद्ध काही धावा करून आत्मविश्वास संपादन करेल, अशी अपेक्षा होती, पण पावसामुळे हा सामना रद्द झाला. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनाला विराट कोहलीच्या फॉर्मची चिंता नाही.
विक्रम राठोड काय म्हणाले?
भारत विरुद्ध कॅनडा सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम राठोड म्हणाले, “विराट कोहली चांगली कामगिरी करत आहे की नाही, याबद्दल मला प्रश्न विचारले जातात तेव्हा मला खूप चांगले वाटते. कारण काळजी करण्यासारखे काही नाही. तो आयपीएलमधून खेळून आला आहे आणि शानदार फलंदाजी करत आहे. इथे दोन-तीन वेळा अशा प्रकारे आऊट झाल्याने काहीही बदलत नाही. तो चांगली फलंदाजी करत आहे.”
फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड पुढे म्हणाले, “त्याला चांगली फलंदाजी करण्याची भूक आहे आणि तो त्यासाठी तयार आहे. मला वाटते की एक फलंदाज म्हणून ही चांगली गोष्ट आहे. आम्ही काही चांगल्या सामन्यांसाठी तयार आहोत. आम्ही त्याच्याकडून काही चांगल्या खेळी पाहिल्या आहेत.” भारताने एकही सामना न गमावता लीग टप्पा संपवला आहे. ग्रुप स्टेजमध्ये त्यांचा एकही सामना नव्हता. ग्रुप स्टेजमधील भारताचा एकमेव खडतर सामना पाकिस्तानविरुद्ध होता, ज्यात टीम इंडियाने ६ धावांनी विजय मिळवला. याशिवाय त्यांनी आयर्लंड आणि अमेरिकेचा सहज पराभव केला.
भारत-कॅनडा सामना का रद्द झाला?
फ्लोरिडामध्ये गेले काही दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसासोबतच शहराला पूराचा धोकाही दिला होता. अमेरिका आणि आयर्लंडमधील सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. यामुळेच अमेरिकेचा संघ सर्वाधिक गुणांसह भारतानंतर सुपर ८ साठी क्वालिफाय झाला. ज्यामुळे पाकिस्तानला स्पर्धेबाहेर जावे लागले. पण नाणेफेकीपूर्वीच फ्लोरिडामध्ये पावसाने विश्रांती घेतली. पण तरीही सामना मात्र शेवटपर्यंत खेळवला गेला नाही.
हेही वाचा – T20 WC 2024 : सुपर-८ दरम्यान पावसाचा अडथळा आला, तर कसा लागणार सामन्यांचा निकाल? जाणून घ्या काय आहेत नियम
याचे कारण म्हणजे फ्लोरिडामधील सततच्या पावसामुळे मैदान खूप ओले झाले होते. खेळपट्टी कव्हर्सने झाकली होती, पण मैदानाचा उर्वरित भाग पावसामुळे मात्र ओला झाला. मैदानाचा एक भाग इतका ओला झाला होता की अथक प्रयत्नांनंतरही तो ओलाच राहिला. चार हेयर ड्रायर्सनेही सुकवण्याचा प्रयत्न केला पण तरीही मैदानाचा भाग सुकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला.