Gary Kirsten criticizes Pakistan team : टी-२० विश्वचषकापूर्वी गॅरी कर्स्टन पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्याच्या नेतृत्वाखाली पाक संघ सुपर ८ पर्यंत पोहोचू शकलेला नाही, अशा स्थितीत संपूर्ण संघ आणि कोचिंग स्टाफवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, गॅरी कर्स्टन यांनी खेळाडूंमधील एकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्स्टनचे हे वक्तव्य तेव्हा आले आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वी वसीम अक्रमने बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यातील चर्चा थांबल्याचा दावा केला होता. पाकिस्तान संघ विश्वचषकात ४ पैकी फक्त २ सामने जिंकू शकला. विशेष म्हणजे पाकिस्तानला अमेरिकेसारख्या नवख्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.

कधी कोणता शॉट खेळायचा कोणालाच कळत नाही –

पाकिस्तानी न्यूज वेबसाइट जिओ सुपर टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ‘सध्याच्या टी-२० विश्वचषक २०२४ मधून बाहेर पडल्यानंतर कर्स्टनने पाकिस्तानी संघाबद्दल सांगितले की, खेळाडूंची फिटनेस पातळी चांगली नाही. इतर संघांच्या तुलनेत हा संघ कौशल्याच्या बाबतीत खूपच मागे आहे. त्याचबरोबर इतके क्रिकेट खेळूनही कोणता शॉट कधी खेळायचा हे कोणालाच कळत नाही.’

पाकिस्तान संघात एकता नाही –

वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूने असेही म्हणाले की, ‘जेव्हापासून मी संघात सामील झालो आहे, तेव्हापासून या संघात एकता नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. तसेच संघांतील खेळाडू एकमेकांना साथ देत नाहीत. मी आतापर्यंत अनेक संघांबरोबर काम केले आहे, परंतु अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नाही. त्यामुळे आता या गोष्टी सुधारणाऱ्या खेळाडूंना संघात घेतले जाईल, अन्यथा त्यांना वगळण्यात येईल.’ गॅरी कर्स्टन यांनी खेळाडूंच्या फिटनेस स्तरावर नाराजी व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेच्या माजी सलामीवीराने असेही सांगितले की, हा संघ कौशल्य पातळीच्या बाबतीत उर्वरित जगापेक्षा खूप मागे आहे.

हेही वाचा – WI vs AFG : टी-२० विश्वचषकात निकोलस पूरनचा कहर, एकाच षटकात कुटल्या तब्बल इतक्या धावा, पाहा VIDEO

भारताविरुद्ध चुकीच्या निर्णयामुळे संघाचा पराभव झाला –

भारताकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्स्टन म्हणाले की, चुकीच्या निर्णयामुळे संघाचा पराभव झाला. गॅरी कर्स्टन म्हणाले, ‘हा नक्कीच निराशाजनक पराभव होता. मला माहीत होते की १२० धावांचे लक्ष्य सोपे नसेल. जर भारतानेच ११९ धावा केल्या होत्या, तर ते आमच्यासाठी नक्कीच सोपे होणार नव्हते. मात्र, मला वाटते सहा किंवा सात षटके शिल्लक असताना संघाची धावसंख्या दोन विकेट्सवर ७२ धावा होती. या परिस्थितीतून सामना बाहेर काढता न येणे निराशाजनक आहे. अशा प्रकारे गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तान संघाबद्दल असलेली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. कर्स्टन सध्या दक्षिण आफ्रिकेतील त्याच्या घरी जाणार आहेत. कारण पाकिस्तान संघाला ऑगस्ट महिन्यापर्यंत कोणतेही क्रिकेट खेळायचे नाही.