Oman captain Aqib Elias challenge to Australia team : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक छोटे संघ (असोसिएट नेशन्स) चांगल्या फॉर्ममध्ये दिसले आहेत, ज्यामध्ये ओमानचा समावेश आहे. पहिल्या सामन्यात ओमानला नामिबियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या संघाने जबरदस्त झुंज दाखवली. आता ओमान संघाचा पुढील सामना विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी ओमान संघाच्या कर्णधाराने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आव्हान दिले आहे.
आकिब इलियासने ऑस्ट्रेलियाला ‘ओपन चॅलेंज’ –
टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ओमानविरुद्ध सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यातील हा सामना ५ जून रोजी होणार आहे, परंतु भारतीय वेळेनुसार हा सामना ६ जून रोजी सकाळी ६ वाजल्यापासून पाहायला मिळेल. या सामन्यापूर्वी ओमानचा कर्णधार आकिब इलियासने ऑस्ट्रेलियाला ‘ओपन चॅलेंज’ दिले आहे.
ऑस्ट्रेलियाकडे पूर्वीसारखे तंत्रशुद्ध फलंदाज नाहीत –
सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ओमानचा कर्णधार आकिब इलियास म्हणाला, “ऑस्ट्रेलियाकडे यापूर्वी स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेनसारखे काही खेळाडू होते, ज्यांचे तंत्र (टेक्निक) चांगले होते आणि ते फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगल्या प्रकारे खेळत होते. पण आता त्यांच्याकडे असे फारसे खेळाडू नाहीत. ऑस्ट्रेलियाचे आताचे खेळाडू मोठे फटके खेळण्याचा विचार करतात. ते फक्त षटकार मारण्याचा प्रयत्न करतात.”
हेही वाचा – IPL 2025 Mega Auction पूर्वी अश्विन चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतला, सीएसकेसाठी निभावणार ‘ही’ भूमिका
प्रत्येक दिवस सारखा नसतो –
खेळपट्टीबद्दल बोलताना आकिब इलियास पुढे म्हणाला, “प्रत्येक दिवस सारखा नसतो. जर त्यांना नामिबियाविरुद्धच्या सामन्यासारखी खेळपट्टी मिळाली, तर ते त्यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. जसे तुम्ही वेस्ट इंडिजला पापुआ न्यू गिनीविरुद्ध अडचणीता सामना करताना पाहिले. वेस्ट इंडिज संघात मोठे हिटर असतानाही त्यांना १३० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला.”
ओमानला नामिबियाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला –
उल्लेखनीय आहे की ओमानने नामिबियाविरुद्धच्या टी-२० विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. या सामन्यात ओमानने नामिबियाला कडवी झुंज दिली, त्यानंतर सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओमानचा संघ १९.४ षटकांत १०९ धावांवर आटोपला. त्यानंतर ओमानच्या गोलंदाजांनी नामिबियाला २० षटकांत ६ बाद केवळ १०९ धावा रोखले. यानंतर एक सुपर ओव्हर झाली, जी टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील तिसरी सुपर ओव्हर होती. ज्यामध्ये नामिबियाने बाजी मारली.