आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) दोन्ही संघ भिडतील. इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव करत तर पाकिस्तानने न्यूझीलंड पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ विजेतेपदासाठी फेव्हरेटपैकी एक मानला जात होता परंतु उपांत्य फेरीत १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर पाक बीन वि. मिस्टर बीन असे मीम्स व्हायरल होत आहेत.
याच टी२० विश्वचषकात पाकिस्तानला सुपर-१२ मध्ये काही दिवसांपूर्वी दुबळ्या झिम्बाब्वेकडून पराभव स्विकारावा लागला होता. त्याच पार्श्वभूमीवर मिस्टर बीन हा ट्रेंड व्हायरल होत आहे. अवघ्या एका धावेने झिम्बाबेने हा सामना जिंकला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा या विश्वचषकातील प्रवास खडतर असणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पाकिस्तानने ह्या सर्व घटना मागे टाकत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना हरवत त्यांनी दाखवून दिले की झिम्बाब्वेविरुद्ध हरलो तो एक अपसेट होता. ती घटना मागे सोडून आम्ही कधीच पुढे गेलो आहोत.
मिस्टर बीन रोवन ऍटकिन्सन हा इंग्लंड देशाचा होता आणि झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर घडलेला प्रकार यामुळे मिस्टर बीन चर्चेत आला होता. आता मिस्टर बीन वि. पाक बीन असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु होण्यामागील कारण टी२० विश्वचषकाची अंतिम फेरीतील सामना हा पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. म्हणून इंग्लंड संघाला मिस्टर बीन आणि पाकिस्तान संघाला पाक बीन असे नाव चाहत्यांकडून ठेवण्यात आले.
नेमकं काय होत प्रकरण मिस्टर बीन
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर वेगळ्याच वादाला तोंड फुटले होते. वादाला कारण ठरले होते ते म्हणजे ‘पाकिस्तानी मिस्टर बीन’. पाकिस्तान विरुद्ध झिम्बाबे सामन्याआधी झिम्बाबेच्या चाहत्याने एक ट्विट केले होते. यामध्ये तो म्हणाला होता, “आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. एकदा तुम्ही आम्हाला मिस्टर बीन रोवॅनऐवजी खोटा मिस्टर बीन दिला होता. उद्या तुम्हाला पराभूत करुन आम्ही याचा बदला घेणार आहोत. पाऊस पडणार नाही यासाठी प्रार्थना करा.” यानंतर ट्विटरवर ‘PAK Bean’ ट्रेंड होऊ लागले होते. कारण झिम्बाब्वेकडून पाकिस्तान हारला होता.
झिम्बाब्वेच्या सनसनाटी विजयानंतर मिस्टर बीनची एकच चर्चा होताना दिसत होती. या दक्षिण-पूर्व आफ्रिकन देशाचे अध्यक्ष इमर्सन नंगाग्वा यांनीही मिस्टर बिनचं नाव घेऊन पाकिस्तानच्या जखमेवरील खपली त्यांनी काढली होती. मिस्टर बीन सारख्या प्रसिद्ध कॅरेक्टरचं क्रिकेट कनेक्शन काय आहे?, असा सवाल अनेकांना त्यावेळी पडला होता.