टी२० विश्वचषक २०२२च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला इंग्लडकडून पराभव स्वीकारावा लागला. यावेळी इंग्लंडने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. दरम्यान या सामन्यात पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला दुखापतीचा सामना करावा लागला. हॅरी ब्रुकची कॅच पकडताना शाहीनला दुखापत झाली. तथापि, त्याने खेळणे कायम ठेवले. मात्र एक चेंडू फेकताच त्याच्या पायामध्ये पुन्हा वेदना होऊ लागल्याने त्याला डगआऊटमध्ये परतावे लागले. या सामन्यात शाहीनला फक्त २.१ षटकच खेळता आले. यावेळी त्याने १३ धावा देऊन एक विकेट घेतली.
शाहिनच्या दुखापतीबाबत आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी म्हटलं की शाहीनच्या दुखापतीने अंतिम सामन्यावर पडला. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमही म्हणाला की शाहीनला गंभीर दुखापत झाल्याने आम्ही सर्वच काळजीत होतो. मात्र आता भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी शाहीनच्या दुखापतीबाबतीत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
T20 World Cup विजेत्याला मिळणार ‘इतकी’ रक्कम; तरीही IPLच्या बक्षीस रकमेशी होणार नाही बरोबरी
सामन्यानंतर सुनील गावस्कर यांना सामान्यांच्या टर्निंग पॉईंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘शाहीनच्या दुखापतीमुळे इंग्लंडने जेतेपद पटकावलं, असं वाटत का?’ असा प्रश्न गावस्कर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, “पाकिस्तान सुरुवातीपासूनच इंग्लंडविरुद्ध १५-२० धावा मागे होता. त्यामुळे मला असे वाटत नाही कारण त्यांच्याकडे पर्याप्त धावसंख्याच नव्हती. जर त्यांनी १५०-१५५ इतका स्कोर केला असता, तर त्यांना हा सामना जिंकण्याची संधी होती. याचा फायदा गोलंदाजांनाही झाला असता. मात्र मला वाटत नाही की शाहीनच्या उर्वरित १० चेंडूंमुळे काहीही फरक पडला असता.”
गावस्कर पुढे म्हणाले की शाहिनच्या उर्वरित चेंडूंमुळे कदाचित पाकिस्तानला मिळाली असती, मात्र इंग्लड तरीही जिंकला असता. दरम्यान, सामना संपल्यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानेही स्वीकारले की त्यांचा संघ २० धावा मागे होता. या विजयानंतर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये टी२० आणि ५० षटकांचा विश्वचषक जिंकणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे.