T20 World Cup PAK vs ZIM: टी२० विश्वचषक २०२२ मध्ये पाकिस्तानचा सलग दुसरा सामना पराभव झाला आहे. भारतानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा पराभव केला. झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्य सोपे असले तरी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची दाणादाण उडवली होती. झिम्बाब्वेने बाबर आझमच्या संघाचा धावांचा रथ रोखून धरल्याने २० षटकात पाकिस्तानला केवळ १२९ धावा करता आल्या आणि अवघ्या १ च धावेच्या फरकाने पाकिस्तानचा पराभव झाला. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या सिकंदर रझाने चार षटकात २५ धावा देत तीन बळी घेतले.
सिकंदर रझाने सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना आपल्या आजच्या खेळाचे श्रेय माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व विद्यमान टीम ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक रिकी पॉंटिंग याला दिले आहे. सामनावीर पुरस्कार मिळताच सिकंदरच्या डोळ्यात आनंदअश्रू तरळले होते, यावेळी काय बोलावे हे आपल्याला सुचत नाही मात्र मी रिकी पॉंटिंगचे आभार मानू इच्छितो असे सिकंदर रजा म्हणाला. आज सकाळी रिकी पाँटिंगचा एक व्हिडीओ पाहिल्यावर प्रेरणा मिळाली व त्यामुळेच आजचा सामना इतका अविश्वसनीय पद्धतीने खेळता आला असेही पुढे रजा याने सांगितले.
आयसीसीच्या ट्विटर पेजवरून रिकी पॉंटिंगयांचा एक व्हिडीओ आज सकाळी शेअर करण्यात आला होता यामध्ये पॉंटिंग सिकंदर रजाचे कौतुक करताना दिसत आहेत. त्याला (सिकंदरला) तो काय करायचे आणि कधी करायचे हे बरोबर माहित आहे असे पॉंटिंगने म्हंटले होते, या व्हिडिओमुळेच आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे सिकंदर रजाने म्हंटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी भारतासमोर हरल्यावर पाकिस्तानला झिम्बाम्बावेनेही आता धूळ चारली आहे.