Pakistan Announced T20 World Cup 2024 Squad: टी-२० विश्वचषक २०२४ साठी पाकिस्तानने आपला १५ सदस्यीय संघ अखेरीस जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २५ मे म्हणजेच आयसीसीच्या अंतिम मुदतीपूर्वी संध्याकाळी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. बाबर आझम या संघाचे नेतृत्त्व करणार आहे. पाकिस्तानच्या टी-२० विश्वचषक संघात पाच वेगवान गोलंदाज, तीन यष्टिरक्षक आणि चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पीसीबीने अद्याप राखीव खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. पाकिस्तान ६ जूनपासून अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करणार आहे.
१५ खेळाडूंपैकी अबरार अहमद, आझम खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, सैम अयुब आणि उस्मान खान हे त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक खेळणार आहेत. तर मोहम्मद अमीर आणि इमाद वसीम हे अनुक्रमे २०१६ आणि २०२१ च्या वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसले होते. इतर आठ खेळाडू हे २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर मोहम्मद अमीर हा २०१० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये दोषी आढळला होता. त्याच्यावर ३ वर्षांची बंदीही घालण्यात आली होती. आता त्याचे बऱ्याच वर्षांनंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. तर हसन अलीला १५ सदस्यीय संघात संधी देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानचा संघ भारत, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेसह अ गटात आहे. टी-२० विश्वचषक २० संघांमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे ४ गट केले असून प्रत्येक गटात ५ संघ आहेत. पाकिस्तान संघ डलास येथे ६ जून रोजी अमेरिकेविरुद्ध पहिला विश्वचषक सामना खेळणार आहे. तर, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना ९ जून (रविवार) रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.
टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान
टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानचे वेळापत्रक
६ जून विरुद्ध यूएसए, डॅलस
९ जून विरुद्ध भारत, न्यूयॉर्क
११ जून विरुद्ध कॅनडा, न्यूयॉर्क
१६ जून विरुद्ध आयर्लंड, फ्लोरिडा