टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना सिडनी येथे दुपारी १:३० वाजता सुरु होणार आहे. तत्पुर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम हा खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे काही दिवसापासून पाकिस्तान संघासाठी ही डोकेदुखी राहिली आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि पाकिस्तान संघाचा सध्याचा मार्गदर्शक मॅथ्यू हेडनने मंगळवारी कर्णधार बाबर आझमचे समर्थन करताना सांगितले की, लवकरच तुम्हाला त्याच्या बॅटमधून मोठी खेळी पाहायला मिळेल. बाबरने आतापर्यंत आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खराब फॉर्ममधून जात असून, त्याने पाच सामन्यांत केवळ ३९ धावा केल्या आहेत.
खराब फॉर्म हा पाकिस्तानच्या कर्णधारासाठी चिंतेचा विषय ठरला आहे, जो गेल्या काही वर्षांपासून आपल्या संघासाठी क्रमवारीत सातत्य दाखवत आहे. बाबर सिडनीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी नेटमध्ये घाम गाळताना दिसला होता. त्यामुळे हेडनने त्याचे कौतुक केले आहे. बाबरला नेटमध्ये काय सल्ला दिला आणि त्याच्या फॉर्मबद्दल चिंता काय असे विचारले असता, हेडन म्हणाला की बाबर लवकरच फॉर्ममध्ये परत येईल.
हेडन म्हणाला, “आपल्या सर्वांना माहित आहे की, कोणत्याही कारकिर्दीत चढ-उताराच हे महत्त्वाचे क्षण असतात. यादरम्यान, ते त्यांच्या महानतेला बळकटी देतात, प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही कसे सावरता हे देखील महत्वाचे आहे. बाबर वाईट टप्प्यातून जात आहे यात शंका नाही. यातून बाहेर पडल्यावर तो मोठा खेळाडू होईल.”
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीराने पाकिस्तानच्या कर्णधाराला त्याच्या खराब फॉर्ममधून लवकर बाहेर येण्यासाठी आणि लवकरच ‘विशेष’ कामगिरी करण्यासाठी पाठिंबा दिला. पाकिस्तानची या स्पर्धेत आतापर्यंत चढ-उताराची कामगिरी झाली आहे. भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने गमावल्यानंतर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध सलग तीन सामने जिंकून त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. सुपर १२ मध्ये आतापर्यंत आपल्या कामगिरीने छाप पाडणाऱ्या न्यूझीलंडचे त्यांना कडवे आव्हान असेल.