आफ्रिकेवर डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार ३३ धावांनी मात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडनी : शादाब खानच्या अष्टपैलू योगदानाच्या बळावर पाकिस्तानने गुरुवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील ‘अव्वल १२’ फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार ३३ धावांनी मात केली. या विजयामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.

सिडनी येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १८५ अशी धावसंख्या उभारली. अडखळत्या सुरुवातीनंतर शादाब (२२ चेंडूंत ५२ धावा) आणि इफ्तिकार अहमद

(३५ चेंडूंत ५१) यांच्या अर्धशतकांमुळे पाकिस्तानला भक्कम आव्हान उभे करता आले. प्रत्युत्तरात आफ्रिकेची ४ बाद ६९ अशी स्थिती असताना पावसाने व्यत्यय आणला. काही वेळानंतर पाऊस थांबल्यावर पुन्हा खेळ सुरू झाला. आफ्रिकेला १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित आव्हान मिळाले. मात्र, त्यांना ९ बाद १०८ धावाच करता आल्या. 

त्यापूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (६) आणि मोहम्मद रिझवान (४) या सलामीवीरांना पुन्हा अपयश आले. स्पर्धेतील पहिला सामना खेळणाऱ्या युवा मोहम्मद हॅरिसने दोन चौकार आणि तीन षटकारांसह ११ चेंडूंतच २८ धावा फटकावल्या. परंतु आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन करताना पाकिस्तानची ५ बाद ९५ अशी स्थिती केली. मात्र, शादाब आणि इफ्तिकार यांनी ८२ धावांची भागीदारी रचली.

आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात अडखळती झाली. शाहीन आफ्रिदीने क्विंटन डीकॉक (०) आणि रायली रूसो (७) यांना झटपट बाद केले. कर्णधार टेम्बा बव्हुमा (३६) आणि एडिन मार्करम (२०) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. मात्र, शादाबने वैयक्तिक पहिल्याच षटकात या दोघांना माघारी पाठवले. यातून आफ्रिकेचा संघ सावरू शकला नाही.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : २० षटकांत ९ बाद १८५ (शादाब खान ५२, इफ्तिकार अहमद ५१; आनरिख नॉर्किए ४/४१) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : १४ षटकांत ९ बाद १०८ (टेम्बा बव्हुमा ३६; शाहीन आफ्रिदी ३/१४, शादाब खान २/१६)

[आफ्रिकेला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित आव्हान]

समीकरणे

* भारताचा अखेरचा साखळी सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. या सामन्यातील विजयासह भारत उपांत्य फेरी गाठेल.

* दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सवर मात केल्यास ते उपांत्य फेरी गाठतील. मात्र, आफ्रिकेचा पराभव झाला, तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ  शकेल आणि भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. भारत-झिम्बाब्वे सामन्याच्या निकालाला मग महत्त्व नसेल. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ भारतासह आगेकूच करेल.

* झिम्बाब्वेने भारताचा पराभव केला, तर पुन्हा रंगत निर्माण होईल. भारताचे ६ गुण असून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना जिंकणाऱ्या संघाचेही ६ गुण होतील. दक्षिण आफ्रिकेने आपला सामना जिंकल्यास ते ७ गुणांसह अव्वल स्थान पटकावतील व दुसरे स्थान

निव्वळ धावगतीवरून ठरेल. 

* पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान त्याच वेळी संपुष्टात येईल.

* मात्र पावसामुळे ही सर्व समीकरणे बदलू शकतात.

गट-२ गुणतालिका

संघ                सा.      वि.   प.     रद्द      नि. धा.      गुण

भारत               ४      ३      १      –   ०.७३०        ६

द. आफ्रिका           ४      २      १      १      १.४४१       ५

पाकिस्तान            ४      २      २      –     १.११७       ४

बांगलादेश            ४      २      २      –     -१.२७६       ४

झिम्बाब्वे             ४      १      २      १      -०.३१३       ३

नेदरलँड्स             ४      १      ३      –      -१.२३३       २

(सा = सामने, वि = विजय, प = पराभव, नि. धा. = निव्वळ धावगती)