टी-२० क्रिकेट वर्ल्डकपचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पाकिस्ताननं न्यूझीलंडवर शेवटच्या क्षणापर्यंत गेलेल्या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवून वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे. आता पाकिस्तानशी फायनलमध्ये कोण भिडणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली असून रोहित आर्मी आज दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा सामना करणार आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडला पराभूत करून भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना व्हावा, अशी इच्छा तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची आहे. मात्र, दुसरीकडे काही पाकिस्तानी चाहत्यांची वेगळीच इच्छा आहे. त्यांना भारत नसून इंग्लंड फायनलमध्ये पोहोचावं, असं वाटतंय. आणि याचं कारण विराट कोहली आहे!

‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवल्यानंतर पाकिस्ताननं दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना झाल्यानंतर काही पाकिस्तानी चाहत्यांच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बीबीएन स्पोर्ट्सचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये दोन पाकिस्तानी महिलांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत. आपल्याला विराट कोहलीची भीती वाटत असून फायनलमध्ये इंग्लंडचा पाकिस्तानशी सामना व्हावा, अशी इच्छा या महिलांनी बोलून दाखवली आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये या महिला क्रिकेटचाहत्यांना टीम इंडियाबद्दल विचारणा केली असता भारतानं सेमी फायनल जिंकू नये, असं या महिलांनी सांगितलं. “मला विराट कोहलीची फार भीती वाटते. जेव्हा तो डोळे दाखवतो ना…मला अजिबात वाटत नाही की भारतानं सेमीफायनल जिंकावी. इंग्लंडनं सेमीफायनल जिंकावी असं मला वाटतं. कारण मग पाकिस्तान नक्की वर्ल्डकप जिंकेल”, अशी प्रतिक्रिया त्यातल्या एका महिलेने दिली आहे. तर दुसऱ्या महिलेने “पाकिस्तान यंदा वर्ल्डकप जिंकेल”, अशी प्रतिक्रिया दिली.

हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

काहींनी विराट कोहलीचे मैदानावरील व्हिडीओ ट्वीट केले आहेत.

…तर काहींनी मीम्सही शेअर केले आहेत.

Story img Loader