Pat Cummins Becomes 1st Player To take double hattrick in T20 World Cup History : ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ सामन्यात इतिहास रचला आहे. पॅट कमिन्स हा टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात दोन हॅट्ट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. पॅट कमिन्सपूर्वी जागतिक क्रिकेटमधील कोणत्याही गोलंदाजाला एवढी मोठी कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे पॅट कमिन्सने सलग दोन सामन्यात हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. पॅट कमिन्सने याआधी बांगलादेशविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती आणि आता त्याने सलग दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅट कमिन्सने दुसऱ्यांदा घेतली हॅट्ट्रिक –

पॅट कमिन्सने रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ सामन्यात रशीद खान (२), करीम जनात (१३) आणि गुलबदिन नईब (०) यांना बाद करून टी-२० विश्वचषक २०२४ मधील आपली दुसरी हॅट्ट्रिक पूर्ण केली. पॅट कमिन्सने १८व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर २ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर रशीद खानला बाद केले. यानंतर पॅट कमिन्सने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर करीम जनातला (१३) बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर गुलबदीन नईबला (०) पॅव्हेलियनमध्ये माघारी पाठवले. अशा प्रकारे पॅट कमिन्स टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात २-२ हॅट्ट्रिक नोंदवणार पहिला गोलंदाज ठरला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही घेतली होती हॅट्ट्रिक –

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी डावातील १८वे षटक टाकण्यासाठी आलेल्या पॅट कमिन्सने या षटकाच्या पाचव्या चेंडूवर महमुदुल्लाला अवघ्या २ धावांवर बाद केले होते. यानंतर या षटकातील शेवटच्या चेंडूवर कमिन्सने मेहदीला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अठराव्या षटकातील अखेरच्या दोन्ही चेंडूवर विकेट्स घेतल्याने कमिन्स पुढच्या षटकात हॅटट्रिकवर होता. कमिन्सने यानंतर डावाच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तौहिद ह्रदयची विकेट घेत या सामन्यात आपली हॅटट्रिक पूर्ण केली.

हेही वाचा – AUS vs AFG : अफगाणिस्तानचा विजय ऑस्ट्रेलियाच्या मुळावर? टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जाणार? काय झालंय नेमकं समीकरण?

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज –

ब्रेट ली – विरुद्ध बांगलादेश (केप टाउन, २००७)
कुर्तिस कॅम्फर – विरुद्ध नेदरलँड्स (अबू धाबी, २०२१)
वानिंदू हसरंगा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (शारजाह, वर्ष २०२१)
कागिसो रबाडा – विरुद्ध इंग्लंड (शारजाह, २०२१)
कार्तिक मयप्पन – विरुद्ध श्रीलंका (गीलॉन्ग, २०२२)
जोशुआ लिटल – विरुद्ध न्यूझीलंड (ॲडलेड, २०२२)
पॅट कमिन्स – विरुद्ध बांगलादेश (अँटिगा, २०२४)
पॅट कमिन्स – विरुद्ध अफगाणिस्तान (किंग्सटाउन, २०२४)

हेही वाचा – VIDEO : अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर मीम्सचा महापूर, नेटकऱ्यांनी मॅक्सवेलची अंडरडेकरशी केली तुलना

पॅट कमिन्सने लावली विक्रमांची रांग –

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पॅट कमिन्स हा २-२ हॅट्ट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज आहे. याशिवाय पॅट कमिन्स हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा जगातील पाचवा गोलंदाज आहे. पुरुषांच्या टी-२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा पॅट कमिन्स हा जगातील सातवा गोलंदाज आहे. पॅट कमिन्स हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक घेणारा चौथा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे. मात्र, पॅट कमिन्सची हॅट्ट्रिक ऑस्ट्रेलियासाठी व्यर्थ ठरली. कारण अफगाणिस्तान संघाने सुपर-८ सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव करत मोठा धक्का दिला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pat cummins becomes 1st player to take double hattrick in t20 world cup history aus vs afg match highlights video vbm