PCB Chairman Mohsin Naqvi Upset on Pakistan Team : टी-२० विश्वचषक २०२४ मधील १९वा सामना रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता पाकिस्तानचा सुपर-८ मध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला आहे. या पराभवानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध बाबरच्या नेतृत्वाखालील संघाच्या कामगिरीवर टीका केली.
रविवारी न्यूयॉर्कमध्ये भारताने दिलेल्या १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला ७ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ११३ धावा करता आल्या. ज्यामुळे नुकतेच पीसीबीचे अध्यक्षपद स्वीकारलेल्या मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तान संघाला खडसावले आहे. जानेवारीमध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेल्या आणि नंतर सरकारमध्ये गृहमंत्री बनलेल्या नक्वी यांनी पीसीबीने खेळाडूंच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले.
पीसीबी अध्यक्षांनी सुचवले की बोर्ड आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एक मजबूत संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल, जे पाकिस्तान पुढील वर्षी आयोजित करणार आहे. ते म्हणाले की बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला ‘माइनर सर्जरी’ची गरज असल्याचे पूर्वी वाटत होते, परंतु भारताविरुद्धच्या पराभवानंतर ‘मेजर सर्जरी’ची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.
‘मेजर सर्जरी’ करणे आवश्यक –
पाकिस्तानी मीडियानुसार, नक्वी म्हणाले, “सुरुवातीला एक माइनर सर्जरी’ पुरेशी ठरेल असे वाटत होते, परंतु भारताविरुद्धच्या अत्यंत खराब कामगिरीनंतर, हे स्पष्ट झाले आहे की ‘मेजर सर्जरी’ करणे आवश्यक आहे. आमची कामगिरी सर्वात वाईट आहे. संघाची कामगिरी सुधारणे हे आमचे सर्वात मोठे आव्हान आहे.”
हेही वाची – VIDEO : ‘भाई ये क्या कर दिया…’, सिराजने मुद्दाम रिझवानला चेंडू मारला? चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल
नवीन प्रतिभेला संधी देण्याची वेळ आली –
पीसीबीचे अध्यक्ष नक्वी पुढे म्हणाले, “आम्ही अगोदर अमेरिकेकडून आणि आता भारताकडून ज्या प्रकारे हरलो, ते खूपच निराशाजनक आहे. आता संघातील खेळाडूंच्या पलीकडे जाऊन खेळाडूंवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. संघ चांगली कामगिरी का करत नाही, असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. विश्वचषक अजून चालू आहे, पण साहजिकच आपण बसून सर्व गोष्टींचा आढावा घेऊ. आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ तयार करण्याची गरज आहे आणि आता संघाबाहेर बसलेल्या नवीन प्रतिभेला संधी देण्याची वेळ आली आहे.”